पीटीआय, बंगळुरू : कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणात झालेल्या ‘क्रॉस व्होटिंग’चा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) तब्बल ११ आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचे समोर आल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय भूकंपाचे पडसाद थेट दिल्लीत उमटले असून, भाजप हायकमांडने कर्नाटकच्या प्रमुख नेत्यांना २३ जून रोजी दिल्लीत पाचारण केले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपने तातडीने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे थिप्पन्नप्पा कमकनूर, पी. व्ही. मोहन, बी. के. हरिप्रसाद, शिवण्णा बी. एस. आणि विनय कार्तिक प्रकाश हे पाच उमेदवार विजयी झाले. भाजपचे लिंगराज पाटील आणि रघू आर. यांना विजय मिळाला; मात्र जेडीएसचे एकमेव उमेदवार गोविंदराजू यांचा पराभव झाला.
काँग्रेसकडे विधानसभेत १३५ आमदार असूनही परिषद निवडणुकीत पक्षाला १५१ मते मिळाली. दुसरीकडे भाजपचे ६४ आमदार असताना पक्षाच्या दोन उमेदवारांना मिळून केवळ ५६ मते मिळाली. जेडीएसकडे १८ आमदार असूनही त्यांच्या उमेदवाराला केवळ १४ मते मिळाली. भाजपने आघाडीच्या सूत्रानुसार तीन आमदारांची मते जेडीएस उमेदवाराला दिली होती. त्यामुळे विरोधी पक्षातील काही आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी किमान चार ते पाच भाजप आमदारांनी, तर सहा ते सात जेडीएस आमदारांनी विरोधी पक्षाला मतदान केल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. संबंधितांना कोणतीही माफी दिली जाणार नाही आणि पक्ष शिस्तभंगाची कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.मतफुटीची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेचे सदस्य सी. टी. रवी, पक्षाचे उपाध्यक्ष एन. महेश आणि आमदार महेश तेंगिनकाई यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला २५ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय नेतृत्वाकडून नाराजी
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली असून २३ जून रोजी विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि राज्य प्रभारी राधामोहन दास अग्रवाल यांना दिल्लीत बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रालोआतील सुमारे ११ आमदार संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
‘इंडिया’ आघाडीवर भाजपची टीका
रांची – झारखंडमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या धक्कादायक पराभवानंतर सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्षांमधील दरी अधिक रुंदावली असल्याचा दावा विरोधी पक्ष भाजपने शुक्रवारी केला. तसेच ही आघाडी केवळ ‘लूट आणि भ्रष्टाचार’ या एकाच किमान सामायिक कार्यक्रमावर चालत असल्याची बोचरी टीकाही भाजपने केली आहे.
