कर्नाटकात जाताय? तर आता बिनधास्त जा. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी करोनाच्या RTPCR चाचणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विजयादशमीच्या दिवशी म्हैसूर येथे होणारा शाही दसरा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या अनेकांना कर्नाटकचे द्वार बिनदिक्कत उघडले. बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्नाटक राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात प्रवेश करण्यासाठी RTPCR चाचणी सक्तीची करण्यात आली होती. त्यासाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे चेक पोस्ट नाका उभारण्यात आला होता. चाचणी केली असेल तरच तिथून प्रवेश दिला जात होता. अन्यथा पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवले होते.

पण आता महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवेश करताना RTPCR चाचणी मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचे चेक पोस्ट हटवले जाणार आहेत.

कर्नाटकातील अनेक भाविक कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूर यासह अन्य तीर्थक्षेत्रांना नवरात्रीत दर्शनासाठी जात असतात. तेथून परत येताना त्यांना RTPCR चाचणीची सक्ती अडचणीची ठरत होती. ही अडचण लक्षात घेऊन चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.