नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये बहुप्रतिक्षित नेतृत्वबदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता नव्या मंत्रिमंडळाच्या रचनेसाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा ठरवण्यासाठी नवनियुक्त मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत आले. ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी मंत्रिमंडळातील काही निवडक मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना शिवकुमार म्हणाले, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून मंत्र्यांची नावे ठरवले जातील. शिवकुमार हे दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये तर सिद्धरामय्या दिल्लीतील एका खासगी हॉटेलमध्ये उतरले आहेत.

मंत्रिमंडळाच्या संख्येबद्दल विचारले असता, “पक्षातील वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्यानुसारच निर्णय घेतला जाईल,” असे उत्तर शिवकुमार यांनी दिले. त्याबरोबरच, नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड आणि १८ जूनला होणाऱ्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांची नावांवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेस राज्यातील राज्यसभेच्या ४ पैकी ३ जागा आणि विधानपरिषदेच्या ७ पैकी ५ जागा सहज जिंकू शकते.

इच्छुकांची गर्दी आणि जातीय समीकरणे

कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्रीपदे ३४ पर्यंत मर्यादित आहेत, मात्र मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. दिल्लीत अनेक माजी मंत्री आणि आमदारांनी तळ ठोकला असून ते नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. नवीन मंत्रिमंडळात जुने अनुभवी चेहरे आणि नवे चेहरे यांचा मेळ घालतानाच, जात आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर पक्षाचा भर असेल. तसेच, या सरकारमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.