नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीचा घोळ बुधवारी दिवसभरातील नाटय़मय घटनांनतरही कायम राहिला. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने समोर ठेवलेले तडजोडीचे पर्याय शिवकुमार यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा घाईघाईने न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्याशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत त्यांच्यात सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सिद्धरामय्या यांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ‘दहा जनपथ’वर राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा लगेचच केली जाईल, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री होणार नसेल तर फक्त आमदार म्हणून पक्षासाठी काम करत राहीन, अशी ताठर भूमिका शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशी झालेल्या दोन तासांच्या चर्चेमध्ये घेतल्यामुळे काँग्रेसला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी मागे घ्यावा लागला.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

कर्नाटकच्या बहुतांश नवनियुक्त आमदारांनी पसंती दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र शिवकुमार यांनी बुधवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘दहा जनपथ’वर भेट घेतली. तिथून शिवकुमार हे ‘दहा राजाजी’ रोडवरील खरगेंच्या निवासस्थानी गेले. त्यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर शिवकुमार यांनी, ‘मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही’, असे पत्रकारांना सांगितले. या विधानामुळे शिवकुमार माघार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले. सिद्धरामय्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्री पदी राहावे, त्यानंतर ३ वर्षे हे पद शिवकुमार यांना दिले जाईल वा सिद्धरामय्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री राहावे व शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद, महत्त्वाची खाती सांभाळावीत. तसेच, प्रदेशाध्यक्षपदीही कायम राहावे, असे दोन प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातील एकही प्रस्ताव शिवकुमारांनी स्वीकारलेला नाही.

दिल्लीत शिवकुमार व सिद्धरामय्या हे ४८ तासांहून अधिक काळ ठाण मांडून आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अधिकृतपणे निर्णयाची घोषणा होत नाही, तोपर्यंत दोन्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार राजधानीत राहणार असल्याचे सांगितले जाते. सिद्धरामय्यांनी बुधवारी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर ‘कर्नाटक भवन’मध्ये समर्थक आमदारांना बदललेल्या परिस्थितीची माहिती दिली. आमदारांची मते जाणून घेण्यासाठी पाठवलेल्या तीनही निरीक्षकांशी खरगेंनी बुधवारी पुन्हा चर्चा केली. खरगेंनी मुख्यमंत्री पदाच्या निवडीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असून ते अन्य काँग्रेस नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. ‘दोन्ही नेत्यांशी खरगेंनी सविस्तर चर्चा केली असून मुख्यमंत्र्याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील’, असे सुरजेवाला म्हणाले.

शिवकुमार यांनाही अनेक आमदारांचा पाठिंबा

कर्नाटकच्या शंभरहून अधिक काँग्रेस आमदारांचा सिद्धरामय्या यांना पाठिंबा असल्याने काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या निवडीला हिरवा कंदिल दिला होता, असे समजते. मात्र लिंगायत व वोक्कलिग या समाजातील आमदारांनी शिवकुमार यांच्या बाजूने वजन टाकले असून शिवकुमार यांना पाठिशी असणाऱ्या संख्याबळात वाढ होऊ लागली आहे. कर्नाटकच्या शेजारी असलेल्या तेलंगणातील काही काँग्रेस नेत्यांनी शिवकुमारांना पाठिंबा दिला आहे. शिवकुमार यांच्या नेतृत्वाचा तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी स्थगित

डी के शिवकुमार यांच्याविरोधात सीबीआयने केलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलैपर्यंत स्थगित केली. शिवकुमार यांच्याकडे ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्याविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयात २३ मे रोजी सुनावणी होणार आहे असे शिवकुमार यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने सुनावणी स्थगित केली.