बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच राज्यात नेतृत्वबदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दिल्लीला बोलावले आहे. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबद्दल सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “उद्या सकाळी ११ वाजता बैठक आहे. बैठकीचा विषय काय आहे, हे मला माहीत नाही. मात्र, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी फोन करून बैठकीबाबत माहिती दिली.” मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांबाबत विचारले असता त्यांनी “त्या चर्चा कायमच सुरू असतात,” एवढीच प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही दिल्ली भेटीचे संकेत दिले. “पक्षाने बोलावले तर मी दिल्लीला जाईन; अन्यथा इथेच राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री बदलाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
सत्तासंघर्षावर तोडगा?
कर्नाटकात २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद ‘अडीच-अडीच वर्षे’ वाटून देण्याचा अनौपचारिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती. त्यामुळे शिवकुमार समर्थक आता त्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्याची मागणी आक्रमकपणे करत आहेत. मात्र, सिद्धरामय्या यांनी वारंवार “मी पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार,” अशी भूमिका घेतली आहे. त्याचवेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करण्याची तयारीही दर्शवली आहे.
फेरबदलावरूनही हालचाली
राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणीही जोर धरत आहे. अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक असून त्यांनी दिल्ली गाठण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या सूत्रांनुसार, सिद्धरामय्या फेरबदलाच्या बाजूने आहेत; तर शिवकुमार यांना आधी नेतृत्व बदलाचा निर्णय व्हावा, अशी भूमिका आहे. राज्यात सध्या तीन मंत्रीपदे रिक्त आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बी. नागेंद्र यांनी राजीनामा दिला होता, तर के. एन. राजन्ना यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मंत्री डी. सुधाकर यांच्या निधनानंतर तिसरे पद रिक्त झाले.
