Karnataka CM Updates: कर्नाटकच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी सकाळी आयोजित एका महत्त्वपूर्ण ‘ब्रेकफास्ट मीटिंग’मध्ये त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केला. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील त्यांच्या शेजारी उपस्थित होते. सिद्धरामय्या आज दुपारी ३ वाजता आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे.

बैठकीत नेमकं काय घडलं?

गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांसमक्ष आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचे स्पष्ट केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या वैयक्तिक कारणास्तव राज्याबाहेर असले, तरीही आपण आपला राजीनामा त्यांच्याकडे पाठवून देणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. यानंतर आता कर्नाटकमध्ये नवीन मुख्यमंत्री आणि विधीमंडळ गटनेता निवडण्यासाठी लवकरच ‘काँग्रेस विधिमंडळ पक्षाची’  बैठक बोलावली जाणार आहे.

३ वर्षांचा वाद अखेर मिटला!

सिद्धरामय्या यांच्या या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला आहे. २०१३ मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू होती. हायकामांडने मध्यस्थी करूनही हा वाद पूर्णपणे निवळला नव्हता. अखेर आज सिद्धरामय्या यांनी माघार घेतल्याने डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दिल्लीतील हायव्होल्टेज ड्रामा आणि ‘हायकमांड’चा फॉर्म्युला

हा राजीनामा सहजासहजी झालेला नाही, तर यामागे दिल्लीतील ‘हायकमांड’ची मोठी रणनीती असल्याचे समजते. गेल्या ४८ तासांत दिल्लीत अत्यंत गोपनीय बैठका आणि खलबतं झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून एक मोठी ‘ऑफर’ देण्यात आली आहे.

सिद्धरामय्या यांच्यासाठी हायकमांडचा फॉर्म्युला

सिद्धरामय्या यांना केंद्रात म्हणजेच राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यांचे सुपुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांना कर्नाटक मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले जाणार आहे. या मोठ्या राजकीय तडजोडीनंतरच सिद्धरामय्या राजीनामा देण्यास तयार झाल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे आता कर्नाटकच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.