पीटीआय, बंगळूरु

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपेक्षेप्रमाणे गुरुवारी पदाचा राजीनामा लोकभवन येथे राज्यपालांचे विशेष सचिव प्रभू शंकर यांच्याकडे सोपवला. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे इंदूरला गेल्याने सिद्धरामय्या यांनी सचिवांकडे हा राजीनामा दिला. यामुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कमोर्त केले जाईल.

राजीनामा देण्यापूर्वी गुरुवारी सकाळी सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना न्याहरीसाठी आमंत्रित केले होते. त्याच वेळी राजीनाम्याच्या निर्णयाची कल्पना त्यांनी दिली. नियोजित मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या वेळी सिद्धरामय्या यांचे आशीर्वाद घेतले. पक्षनेतृत्वाच्या निर्देशानुसार राजीनामा दिला, यापुढेही राज्याच्या राजकारणातच राहणार असून, राज्यसभेवर जाणार नसल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. राजीनामा दिल्यानंतर सिद्धारामय्या दिल्लीला रवाना झाले. मात्र खराब हवामानामुळे त्यांना घेऊन जाणारे विमान जयपूरमध्ये उतरविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. या विमानात सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र तसेच काँग्रेस प्रभारी रणदिपसिंह सुरजेवाला हे होते. दिल्ली दौर्‍यात सिद्धरामय्या हे नव्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड, मंत्रिमंडळाचे स्वरूप तसेच नवा प्रदेशाध्यक्ष याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांना हे पद सोडावे लागेल.

‘केद्र सरकारनेे निधी रोखला’

लोकभवन येथे राजीनामा सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांनी तीन वर्षांत सरकारने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम केल्याचे सांगितले. विरोधकांनी सातत्याने मला लक्ष्य केले. अगदी कुटुंबावरही खोटे आरोप करण्यात आले. मात्र जनसेवेचा मार्ग सोडला नाही, असे सिद्धरामय्या यांनी नमूद केले.

 राज्यात विक्रमी १७ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत विरोधकांचे दावे चुकीचे आहेत. तसेच केंद्राने निधी रोखल्याचा आरोपही त्यांनी केला. वस्तू व सेवा कर वसुलीत कर्नाटक देशात दुसर्‍या क्रमांकावर असून, ८.१ टक्के विकासदर असल्याचे सांगितले.

राजीनाम्यामागे दबाव नाही’

नव्या मुख्यमंत्र्यांबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्ष व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राजीनाम्यासाठी कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट करताना मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले. जनतेचा जो दृढ विश्वास आहे त्यामुळे अनेक दशके राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिलो अशी कृतज्ञताही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री होण्याचे कधी स्वप्नही पाहिले नव्हते, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.