Karnataka Politics : गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमधील वाद काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आला होता. कर्नाटक सरकारमधील काही आमदारांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र, काँग्रेस हायकमांडने या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कर्नाटक सरकारमधील जवळपास ३० काँग्रेस आमदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ३० आमदार एकत्र मिळून तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची सांगितली जात आहे. हे ३० आमदार एकत्र मिळून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील हे ३० आमदार दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडकडे कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी करण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास भाग पाडण्यासाठी पक्षाच्या हायकमांडवर दबाव आणण्याचा या आमदारांचा या मागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेस आमदार अशोक पट्टन काय म्हणाले?
कर्नाटक काँग्रेसचे आमदार अशोक पट्टन यांनी या संदर्भात बोलताना म्हणाले की, “जवळपास ३० आमदार एकत्र आले आहेत. निम्मे आमदार सिद्धरामय्या यांना आणि बाकीचे डी.के.शिवकुमार यांना पाठिंबा देत आहेत असं नाही. मात्र, आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल. आम्हालाही काही आश्वासने देण्यात आलेले होते. पण आम्हालाही सर्वांना संधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे याची आठवण करून देण्यासाठी आम्ही दिल्लीला आलो आहोत. अर्थातच, आम्ही नाराज आहोत. आम्ही कोणालाही ब्लॅकमेल करत नाहीत. आम्ही फक्त ही मागणी करत आहोत”, असं आमदार अशोक पट्टन यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, या ३० आमदारांचा गट हा केवळ राहुल गांधी यांनाच नव्हे तर मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनाही भेटण्याची शक्यता आहे. या आमदारांच्या म्हणण्यांनुसार, जोपर्यंत जुने चेहरे हटवले जात नाहीत, तोपर्यंत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार नाही. दरम्यान, आता या आमदारांच्या मागण्यांबाबत काँग्रेस हायकमांड काय भूमिका घेतं? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
