Hubli Dharwad Doctor Murder Case: कर्नाटकमधील धारवाडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय डॉक्टर किरण होनन्नवार हे त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेले आढळून आले. त्यांची पत्नी डॉ. प्रियांकानेच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच डॉक्टर दाम्पत्याच्या आठ वर्षांच्या मुलावरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डॉ. होनन्नवार यांच्या घराचे दार उघडले असता आतमध्ये रक्ताचा सडा आढळून आला. हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार हेही घटनास्थळी आले होते. त्यांच्या लक्षात आले की, आठ वर्षांच्या मुलाचा श्वास सुरू होता. त्यांनी तातडीने मुलाला उचलून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
पोलिसांमधील सूत्रांनी काही माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण यांचे नातेवाईक आणि मित्र मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी त्यांना वारंवार फोन करत होते. मात्र प्रत्येक वेळी डॉ. प्रियांका फोन उचलत होत्या. रात्री त्यांनी सांगितले की, किरण आराम करत आहेत. तसेच सकाळी फोन उचलून त्या म्हणाल्या की, डॉ. किरण ड्युटीवर गेले आहेत.
मृतदेहाशेजारी पत्नी मोबाइल पाहण्यात व्यस्त
अखेर डॉ. किरण यांचे कुटुंबीय बुधवारी सायंकाळी थेट दाम्पत्याच्या घरी धडकले. तेव्हा किरण आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी डॉ. प्रियांका बेडवर पडून मोबाइल स्क्रोलिंग करत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Anesthesiologist Dr. Kiran Honannavar was found murdered inside his apartment in Dharwad, with his 8 year old son lying beside him. Most first responders didn't check or realise the boy lying in a pool of blood was still alive. Police commissioner Shashi Kumar who noticed helped… pic.twitter.com/WZRmsdUl0s
— Deepak Bopanna (@dpkBopanna) July 16, 2026
हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, डॉ. किरण होनन्नवार हे चिरायू रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी डॉ. प्रियांका खट्टनहळ्ळी या एमबीबीएस पदवीधारक असून नेत्रतज्ज्ञ आहेत. हे दाम्पत्य त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाबरोबर राहत होते. तर समोरच्याच इमारतीमध्ये डॉ. किरण यांचे कुटुंबीय वास्तव्यास होते.
डॉ. प्रियांका यांनीच खून केल्याचा संशय
पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी पुढे म्हटले की, ही घटना केव्हा घडली आणि त्यामागे कोणती कारणे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर घटना घडली तेव्हा फ्लॅटमध्ये फक्त पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा होता. इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणानुसार, घरात तिसरा व्यक्ती शिरल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

तसेच शेजारीही बुधवारी सकाळपासून दरवाजा ठोठावत होते, मात्र प्रियांका यांनी पती बाहेर गेले असल्याचे त्यांना सांगितले. “आम्ही या घटनेचा सखोल तपास करत आहोत. आम्ही डॉ. प्रियांका यांच्याशी बोललो असून त्यांच्या बोलण्यातून विसंगती समोर आली असून त्या असंबंध बोलत आहेत. प्रथमदर्शनी त्यांनीच खून केल्याचे दिसत आहे. पण तरीही आमचा तपास सुरू असून नेमक्या कारणांचा शोध घेतला जाईल”, अशीही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
