काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचे पोस्टर फाडल्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी याप्रकरणी भाजपा नेत्यांना जाहीरपणे इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेच स्वागत करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र हे सर्व पोस्टर फाडून टाकण्यात आले असून, काँग्रेस नेत्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

“ते आमचे पोस्टर आणि फ्लेक्स फाडत आहेत. मला त्यांना इशारा द्यायचा आहे की, जर ते असंच करत राहिले तर त्यांना कर्नाटकमध्ये मोकळेपणाने फिरता येणार नाही. राज्यातील आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तेवढी ताकद आहे हे लक्षात ठेवा,” अशी धमकीच सिद्धरमय्या यांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट ; मल्लिकार्जुन खर्गे झाले IN तर दिग्विजय सिंह OUT!

यावेळी त्यांनी आपण बुधवारी आणि गुरुवारी पोलिसांशी चर्चा केली होती अशी माहिती दिली. ते म्हणाले “पुढील सहा महिन्यात सरकार बदलणार आहे, हे पोलिसांनी लक्षात ठेवावं. काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आणि मी पोलिसांनाही हाच इशारा देत आहे”.

राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा शुक्रवारी कर्नाटकमध्ये पोहोचली. यावेळी सिद्धरमय्या यांच्यासहित इतर काँग्रेस नेते राज्याच्या सीमेवर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.