Father Kills Daughter Marriage : कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या एका १७ वर्षांच्या मुलीची तिच्याच वडिलांनी हत्या केल्याचं उघड झालं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मेघना असे या मृत मुलीचे नाव असून, ती शिरा तालुक्यातील निंबेमरदहळ्ळी गावात आपल्या माता-पित्यांसोबत राहत होती. लग्नाच्या कारणावरून घरात झालेल्या सततच्या वादातून वडील थिम्मरायाप्पा यांनीच तिची हत्या केल्याचे पुरावे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस सूत्रांनुसार, १६ एप्रिल रोजी मेघना अचानक बेपत्ता झाली होती. तिची आई निर्मला संध्याकाळी ६.३० वाजता मजुरी करून घरी परतली, तेव्हा मेघना घरात नव्हती. निर्मलाने मेघनाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. यामुळे संशय बळावल्याने तिने पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
लग्नाच्या नियोजनावरून वाद
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मेघनाच्या लग्नावरून कुटुंबात वारंवार भांडणे होत असत. आई निर्मला आणि तिचे नातेवाईक मेघना १८ वर्षांची झाल्यावर तिचे लग्न एका नातेवाईकाच्या मुलाशी करून देण्याच्या तयारीत होते. मुलाकडच्या लोकांनी लग्नासाठी साड्या आणि मंगळसूत्रही खरेदी केले होते. परंतु, थिम्मरायाप्पाचा या लग्नाला तीव्र विरोध होता. पत्नीच्या नातेवाईकांमध्ये मुलीचे लग्न करून देण्यास त्याचा नकार होता. यावरून गेल्या ४-५ महिन्यांपासून घरात सतत वाद सुरू होते. अशाच एका मोठ्या वादानंतरच्या दुसऱ्या दिवशी मेघना बेपत्ता झाली. पाठोपाठ तिचे वडीलही गायब झाल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला.
हत्येनंतर बेपत्ता झाल्याची तक्रार
पोलिसी खाक्या दाखवताच थिम्मरायाप्पाने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने प्रथम मेघनाला विहिरीत ढकलले आणि नंतर तिच्यावर दगड फेकले. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून एका निर्जन ठिकाणी गाडून टाकला. तपास अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, हत्या केल्यानंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून थिम्मरायाप्पा पत्नीसोबत स्वतः पोलीस ठाण्यात गेला होता आणि तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यास मदत केली होती.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
