Crime News : १६ महिन्यांपूर्वी कर्नाटकच्या हवेरी येथे काही जण हॉटेलमधील एका आंतरधर्मीय जोडप्याच्या खोलीत घुसले, त्यानंतर महिलेला जवळच्या जंगलात ओढून घेऊन गेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर आता या प्रकरणातील आरोपींपैकी ७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ज्यानंतर तुरूंगातून सुटलेल्या या आरोपींनी रस्त्यावरून घरी जात असताना जल्लोष करत मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही मिरवणूक हवेरीमधील शहर अक्की अलूर येथे काढण्यात आली होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही कार आणि दुचाकी पाहायला मिळत आहेत. तसेच यामध्ये आरोपी सुटकेचा आनंद व्यक्त करताना आणि ‘व्हिक्टरी साईन’ दाखवताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हवेरी सेशन कोर्टाने नुकतेच सात आरोपींनी जामीन दिला आहे. ज्यामध्ये आफताब चंदनकट्टी, मादर साब मांदाक्की, समीवुल्ला ललनवार, मोहमद सादीक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौशिक चोटी आणि रियाज साविकेरी यांचा समावेश आहे. या सर्वांना एका २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर अनेक महिने न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

नेमकं काय झालं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडिता ही अल्पसंख्यांक समुदायातील असून ती दीर्घ काळापासून कर्नाटक स्टेट रोड कॉर्पोरेशनच्या एका ४० वर्षीय चालकाबरोबर नात्यात होती. हे दोघे ८ जानेवारी २०२४ मध्ये हवेरी येथील एका खाजगी हॉटेलमध्ये गेले होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला हॉटेलमधून ओढून जवळच्या जंगलात घेऊन गेले आणि तेथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतरच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडिता आरोपींची ओळख पटवण्यात अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे खटला कमकुवत झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात एकूण १९ जणांना अटक करण्यात आली होती, सात मुख्य आरोपींचा समावेश होता. इतर बारा जणांवर गुन्ह्यात मदत करणे किंवा पीडितेवर शारीरिक हल्ला करण्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यापैकी बारा आरोपींना जवळजवळ दहा महिन्यांपूर्वी जामिनावर सोडण्यात आले होते. उर्वरित सात जणांना, ज्यांना मुख्य संशयित मानले जात होते, त्यांना सतत्याने जामीन नाकारला जात होता, मात्र आता कोर्टाने त्यांना देखील जामीन दिला आहे.