Karnataka Gutkha Ban : कर्नाटक सरकारने राज्यात तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
कर्नाटक राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या १५ जून २०२६ च्या अधिसूचनेनुसार, ही बंदी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३० च्या उप-कलम (२) च्या खंड (ए) आणि अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) नियमन, २०११ च्या नियमन २.३.४ अन्वये लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याचा विचार करून हा आदेश जारी करण्यात आला असून, अधिसूचनेच्या तारखेपासून संपूर्ण कर्नाटकात तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्रीवर बंदी असेल. याशिवाय, अंतिम उत्पादनात तंबाखू किंवा निकोटीन असलेले आणि वेगळ्या नावाने विकले जाणारे इतर पदार्थही या बंदीच्या कक्षेत येतील; मग ते पॅक केलेले असोत वा सुटे, किंवा ग्राहकांना सहज एकत्र करता येतील अशा पद्धतीने वेगवेगळ्या पाकिटांत विकले जात असोत.
निकोटीन असलेल्या सर्वच पदार्थांवर बंदी
या अधिसूचनेत म्हटलं आहे की, “अंतिम उत्पादनात तंबाखू किंवा निकोटीन असलेले आणि स्वतंत्रपणे विकले जाणारे इतर कोणतेही पदार्थ, मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असोत, पॅक केलेले असोत किंवा सुटे असोत किंवा एकाच स्वरूपात किंवा वेगळे पॅक करून ग्राहकांना सहज एकत्र करता येतील अशा पद्धतीने विकले किंवा वितरित केले जात असोत, त्यांच्यावर बंदी असेल.
तंबाखू आणि निकोटीनचे घटक असलेले गुटखा/पान मसाला, जे सॅशे, पुड्या, पाकिटे किंवा कंटेनर इत्यादींमध्ये पॅक केलेले असतात, त्यांच्यावर अधिसूचनेच्या तारखेपासून पुढील एका वर्षासाठी संपूर्ण कर्नाटक राज्यात बंदी लागू राहील.”
