Karnataka Maharashtra border issue: मागील काही दिवसांपासून पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मंगळवारी अधिक तापला. कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौरा लांबणीवर टाकल्याने आधीच टीकेचे धनी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी वेगाने हालचाली करून सीमावादाबाबत कठोर भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही दिली. दरम्यान याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली भूमिका कायम असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर फोनवर चर्चा झाल्याची माहिती बोम्मई यांनी ट्वीटरवरुन दिली.

मुख्यमंत्री शिंदेंबरोबर फोनवर चर्चा झाल्याची माहिती बोम्मई यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर मी फोनवर चर्चा केली. आमच्या दोघांचंही एकमत झालं आहे की दोन्ही राज्यांमध्ये शांतता, कायदा सुव्यवस्था कायम रहावी,” असं बोम्मई यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Accused arrested from Pune who killed a BJP official in Karnataka pune news
कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
Supriya Sule Sunetra Pawar
“बारामतीत माझ्याविरोधात…”, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या

दोन्ही राज्यांमध्ये शांतता नांदावी यासंदर्भात दोन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं सांगतानाच बोम्मई यांनी कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्येच कायदेशीर लढाई लढू असा इशारा देत आपली भूमिका ठाम असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये बोम्मई यांनी, “दोन्ही राज्यांमधील लोकांचे एकमेकांशी चांगले संबंध आहे. मात्र असं असलं तरी कर्नाटक सीमाप्रश्नाबद्दल आमची भूमिका जैसे थे आहे. सर्वोच्च न्यायालयामध्येच कायदेशीर लढाई होईल,” असंही स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादसंर्भातील अग्रलेख : नुरा कुस्ती!

बोम्मईंचं विधान अन् वाद

जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर सीमाप्रश्न पुन्हा तापला. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या राज्याच्या मंत्र्यांचा मंगळवारचा नियोजित बेळगाव दौरा लांबणीवर टाकूनही कर्नाटकच्या कुरापती कायम राहिल्या. कर्नाटकातील हिरे बागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घालून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. जवळपास सहा ट्रकची नासधूस करण्यात आली. कर्नाटक पोलीस आणि वेदिकेचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली.

पुण्यात पडसाद

या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. पुण्यात स्वारगेट येथून कर्नाटकात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाडय़ांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र’ असे घोषवाक्य लिहून कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”

कोल्हापूरमध्येही राडा

कोल्हापुरातही या घटनेचा निषेध करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित असून, त्याला कर्नाटकातील भाजपा सरकारचे पाठबळ असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. कर्नाटकची गुंडगिरी अशीच सुरू राहिली तर त्याला महाराष्ट्रातूनही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रकवरील हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली काच फोडून शिवरायांचा अवमान करण्यात आला आहे. त्याचा निषेध करत माजी खासदार संभाजीराजे यांनी या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

शिंदे-बोम्मई लवकरच भेटणार

बेळगावजवळ झालेल्या ट्रकवरील हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. शिंदे आणि बोम्मई यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

फडणवीस काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना हे प्रकार घडणे चुकीचे आहे. देशात संविधानाने कोणालाही कुठेही जाण्याचा, राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणतेही राज्य कोणालाही रोखू शकत नाही. संविधानातील तरतुदींचे पालन राज्य सरकार करीत नसेल, तर आम्हाला केंद्राकडे जावे लागेल. याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी भूमिका या साऱ्या प्रकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली