Karnataka man car bomb blast ex girlfriend : कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात एका व्यस्त महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचं अपहरण करून चालत्या कारमध्ये तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यामध्ये अपहरणकर्त्याचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शुक्रवारी सिरा तालुक्यातील जोगीहल्ली जवळ राष्ट्रीय महामार्ग-४८ वर घडली. तिथे एका कारचा अचानक भीषण स्फोट होऊन कारने पेट घेतला. या स्फोटात ३० वर्षीय नागेंद्र नावाचा युवक जागीच ठार झाला, तर ती महिला आणि कॅब चालक प्रवीण हे जखमी झाले असून त्यांच्यावर तुमकुरू जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेंद्र आणि ती महिला (जी बंगळुरूमध्ये ओटी टेक्निशियन आहे) यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. परंतु काही काळापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. वैयक्तिक मतभेदानंतर महिलेने नागेंद्रचा फोन नंबर ब्लॉक केला होता. शुक्रवारी सकाळी नागेंद्रने बंगळुरूच्या जयनगर येथील तिच्या भाड्याच्या खोलीवर जाऊन वाद घातला आणि तिला एका पिवळ्या नंबर प्लेटच्या उबर कॅबमधून जबरदस्तीने पळवून नेले. महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी जयनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

गाडीने पेट घेतला अन्…

अंकोलाच्या दिशेने जात असताना नागेंद्रने तिला जीवे मारण्याची आणि स्वतः आत्महत्येची धमकी दिली होती. पोलिसांच्या संशयानुसार तो सोबत स्फोटके घेऊन जात होता, जी त्याने प्रवासादरम्यान महिलेला दाखवली होती. जोगीहल्ली जवळ नागेंद्रने चालत्या गाडीत महिलेवर चाकूने हल्ला केला. चालकाने तात्काळ गाडी थांबवली, त्यामुळे महिलेला दरवाजा उघडून बाहेर उडी मारता आली. ती बाहेर पडताच काही सेकंदांत वाहनात तीव्र स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतला. नागेंद्र आतमध्येच अडकल्याने मदत मिळण्यापूर्वीच त्याचा होरपळून मृत्यू झाला.

या स्फोटामुळे व्यस्त महामार्गावर एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब वाहतूक कोंडी झाली होती. तुमकुरूचे पोलिस अधीक्षक अशोक के.व्ही. यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार नागेंद्रकडे स्फोटक उपकरण होते आणि त्याने स्वतः हा स्फोट घडवून आणल्याचे दिसते. पोलिसांनी घटनास्थळावरून बॉम्बसदृश स्फोटक साहित्य जप्त केले असून, हे स्फोटक नेमके कोणत्या प्रकारचे होते, त्याचा स्फोट कसा झाला आणि ते कुठून आणले, याचा सखोल तपास सुरू केला आहे. कल्लांबेला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.