Karnataka Minister SS Mallikarjun Abuses BJP MLA: कर्नाटक सरकारमधील विद्यमान मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी भाजपा आमदार बी. पी. हरीश यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. भद्रा जलशयातून पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी मंत्री मल्लिकार्जुन यांची भेट घेतली तेव्हा ऑन कॅमेरा हा प्रसंग घडला. हरिहर भागातील शेतकऱ्यांनी आमदार हरीश यांच्या सल्ल्यानंतर भेटीला आल्याचे सांगताच मंत्र्यांचा पार चढला आणि त्यांनी ऑन कॅमेरा खालच्या भाषेत टीका करत आक्षेपार्ह विधान केले.

शेतकरी भेटीनंतर मल्लिकार्जुन यांचा पारा चढला

हरिहर विधानसभा मतदारसंघाचे बी.ही हरीश हे आमदार आहेत. येथील शेतकऱ्यांनी भद्रा जलाशयातून पाणी सोडण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंत्री मल्लिकार्जुन यांची भेट घेतली. मंत्री जात असतानाच शेतकऱ्यांनी त्यांना घेरले व पाण्याबाबत प्रश्न विचारला. एवढेच नव्हे तर भाजपा आमदार हरीश यांनी सल्ला दिल्यानंतर आम्ही भेट घेण्यासाठी आल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. यानंतर मंत्री मल्लिकार्जुन यांचा पारा चढला व त्यांनी हरीश यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली.

काय म्हणाले मल्लिकार्जुन

“पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी पाणी नाही. आम्ही याबाबत आमदार बी. पी. हरीश यांना विचारले तर त्यांनी मंत्री महोदयांना विचारा असे सांगितले”, असे शेतकरी मल्लिकार्जुन यांना म्हणाले. यानंतर संतापलेल्या मल्लिकार्जुन यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर करत टीका केली. तसेच, त्यांना चप्पलने मारा, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. एवढेच नव्हे तर, हरीश यांना आण्णा म्हणून आदर देण्याची देखील गरज नसल्याचे मल्लिकार्जुन म्हणाले.

आमदार हरीश यांचे प्रत्युत्तर, भाजपाची टीका

मल्लिकार्जुन यांच्या वक्तव्याप्रकरणी आमदार बी. पी हरीश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांशी व्यवस्थित करण्याऐवजी त्यांनी माझ्याबाबत अश्लील भाषा वापरली. लोक त्यांना धडा शिकवतील, असे हरीश म्हणाले. कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी देखील मंत्री मल्लिकार्जुन यांच्यावर टीका केली. “मंत्र्यांनी आमदार हरीश यांच्याविरोधात असंसदीय भाषेचा वापर केलाय. त्यांनी आमदारांच्या पालकांना शिवीगाळ केली. हा केवळ हरीश यांचा अपमान नाही तर मतदारसंघातील जनतेचाही अनादर आहे. तुम्ही सत्तेत आहात म्हणून अशा भाषेचा वापर करत असाल तर, येत्या दिवसात लोक तुमच्याबाबत निर्णय घेतील”, असे विजयेंद्र म्हणाले.