Karnataka MLA Niece 75000 Salary scam: कर्नाटक सरकारने सोमवारी काँग्रेस आमदाराच्या भाचीला सेवेतून बडतर्फ केलं आहे. बागलकोट जिल्ह्यातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एमडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असतानाच, सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून दरमहा ७५ हजार रुपये पगार लाटल्याचा आरोप तिच्यावर आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

बागलकोटचे आमदार उमेश मेटी यांची भाची आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार यारगल यांची मुलगी असलेल्या डॉ. अंकिता आर. यारगल यांची एप्रिल २०२५ मध्ये बागलकोट शहरातील वाँबे कॉलनी येथील ‘नम्मा क्लिनिक’मध्ये कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन बाळे यांनी या डॉ. अंकिता आर. यारगलला तात्काळ सेवेतून मुक्त करण्याचे निर्देश दिले. “मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी अहवाल मागवला असून, पुढील कारवाई सुरू केली जाईल”, असं त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

नम्मा क्लिनिकमध्ये नियुक्ती, पण कर्तव्यावर गैरहजर

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक यांनी सांगितलं की, डॉ. अंकिता यारगल यांनी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा न देताच या वर्षाच्या मार्च महिन्यात एका खाजगी महाविद्यालयात पॅथॉलॉजीच्या एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलकोटच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरस्वती मागी यांनी काही दिवसांपूर्वी वाँबे कॉलनीतील नम्मा क्लिनिकला भेट दिली होती, तेव्हा डॉ. यारगल तिथे उपस्थित नव्हत्या. डॉ. मागी यांनी फोनवरून संपर्क साधला असता, डॉ. यारगल यांनी आपण शहराबाहेर असल्याचं सांगितलं. मात्र, कर्तव्यावर या महिला डॉक्टर गेल्या तीन महिन्यांपासून क्लिनिकमध्ये आलेल्याच नाहीत, तरीही त्यांची हजेरी मात्र नियमितपणे लावली जात आहे, अशी तक्रार रुग्णांनी डॉ. मागी यांच्याकडे केली.

नाईक यांनी असाही आरोप केला की, डॉ. यारगल कधीही क्लिनिकमध्ये आल्या नाहीत आणि केवळ परिचारिकाच (नर्सेस) हे क्लिनिक चालवत आहेत. “तिच्या या नियुक्तीमागे तिचे वडील डॉ. राजकुमार यांचा हात आहे. हा केवळ करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आणि बेकायदेशीर प्रकार नसून, सरकारने दिलेल्या आरोग्य सुविधांपासून जनतेला वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. सध्या हे नम्मा क्लिनिक बंद अवस्थेत आढळलं आहे”, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना दरमहा ७५ हजार रुपये मिळत होता.

‘मी तिचा पगार जारी केलेला नाही’

अंकिताचे वडील डॉ. राजकुमार यारगल यांनी पत्रकारांना सांगितलं की, तिची नियुक्ती डॉ. मंजुनाथ दोड्डेरी यांच्या कार्यकाळात झाली होती. “मी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा मागोवा घेतल्यानंतर तिचा पगार जारी केलेला नाही. मी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तिला कर्तव्यावरून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत”, असं ते म्हणाले. या घटनेवर डॉ. अंकिता किंवा आमदार उमेश मेटी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.