Plane Crash : कर्नाटकच्या विजयपुरा शहराजवळ रविवारी एका खासगी प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. रेड बर्ड एव्हिएशनच्या मालकीचं हे विमान होतं अशी माहिती आता समोर येत आहे. या अपघातात या विमानातील दोन्ही पायलट जखमी झाले आहेत.
कर्नाटकातील विजयपुरा जवळील मंगलोर गावात रविवारी ही घटना घडली आहे. या खासगी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हे विमान एका शेतात कोसळलं. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघाताच्या वेळी या विमानात दोन जण होते. विमान कोसळल्यानंतर हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताच्या व्हिडीओमध्ये हे विमान जमिनीवर आदळल्यानंतर काही अंतरावर घसरत गेल्याचं दिसत आहे. या अपघातात विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ही अपघाताची घटना घडल्यानंतर अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. हा अपघात नेमकं कशामुळे घडला? याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्राथमिक माहिती देताना तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं की, “हे रेड बर्ड एव्हिएशनच्या मालकीचं खासगी विमान आहे. ते कलबुर्गीहून बेळगावीकडे जात होतं. मात्र, मध्येच अचानक विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अपघात झाला.”

