Karnataka Politics : गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी एक मोठा दावा केला आहे. काँग्रेसचे कर्नाटकातील २५ आमदार फुटणार असून ते भाजपात येण्यास तयार असल्याचं वक्तव्य विजयेंद्र यांनी केलं आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

बी.वाय. विजयेंद्र यांनी म्हटलं की, जर आता निवडणुका झाल्या तर मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसह काँग्रेसचे २५ आमदार भाजपामध्ये येतील. विजयेंद्र यांच्या या वक्तव्यावर डी.के.शिवकुमार यांनी प्रतिक्रिया देत त्या आमदारांना आता लगेच तिकडे घ्या, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

बी.वाय. विजयेंद्र यांनी काय म्हटलं?

सत्ताधारी काँग्रेसमधील मंत्र्यांना फोडण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे का? या प्रश्नावर बोलताना बी.वाय. विजयेंद्र यांनी म्हटलं की, “पक्षाला असे प्रयत्न करण्याची काही गरज नाही. कारण कर्नाटकातील राजकीय वातावरण भाजपाच्या बाजूने दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक आमदार पक्ष बदलण्यास इच्छुक आहेत. आम्हाला काँग्रेसचे नेते फोडण्याची गरज नाही. पण पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक गोष्ट सांगतो. उद्या जर निवडणुका जाहीर झाल्या, तर डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह २५ आमदार भाजपामध्ये सामील होतील. तसं वातावरण निर्माण झालेलं आहे”, असा दावा विजयेंद्र यांनी केला.

डी.के.शिवकुमार काय म्हणाले?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी म्हटलं की, “त्या आमदारांना आताच तुमच्या पक्षात घ्या. यामध्ये कोणताही विलंब करू नका”, असं खुलं आव्हान डी.के.शिवकुमार यांनी बी.वाय. विजयेंद्र यांना दिलं आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या ‘क्रॉस व्होटिंग’वरूनही मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी विजयेंद्र आणि एच.डी.कुमारस्वामी यांच्यावर टीका केली. “एच.डी.कुमारस्वामी आणि विजयेंद्र या दोघांनाही कोणी ‘क्रॉस व्होटिंग’ केलं हे सांगता आलं नाही. त्यांच्याच नेत्यांनी काँग्रेससाठी ‘क्रॉस व्होटिंग’ केलं. त्यामुळे विजयेंद्र यांनी वेळ वाया न घालवता त्या आमदारांना आताच तिकडे घ्यावं”, अशी खोचक टीका डी.के.शिवकुमार यांनी भाजपावर केली आहे.