बंगळुरू : कर्नाटकमध्ये नेतृत्त्वबदल होणार हे निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची सूत्रे जातील हे गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे स्पष्ट होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी मंत्रिमंडळातील सहकार्यांना न्याहारीसाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर राज्यपालांकडे ते राजीनामा सुपूर्द करू शकतात.
दरम्यान, आपण राजीनामा देणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि आर. व्ही. देशपांडे यांनी केला आहे.
सिद्धरामय्या दिल्लीहून परतल्यानंतर देशपांडे यांनी त्यांची भेट घेतली. काही आमदारांनी त्यांना राजीनामा देऊ नये अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यावर, आपण पक्षश्रेष्ठींना शब्द दिला असून, त्याचा आदर करावा लागेल असे उत्तर सिद्धरामय्या यांनी दिल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले. अनेक मंत्र्यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेतली. गुरुवारी किंवा त्यानंतर सिद्धरामय्या हे राजीनामा देतील असे देशपांडे यांनी नमूद केले.
दुसरीकडे, याबाबत गुरुवारीच बोलू असे ७७ वर्षीय सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. काँग्रेस नेतृत्त्वाबरोबर मंगळवारी दिल्लीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्याच वेळी सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त होते. त्यामुळे शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. आता गुरुवारी सिद्धरामय्या राजीनामा देतील असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांनी वेळही मागितल्याचे सूत्रांनी नमूद केले.
