नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये येऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा मुलगा यतिंद्र हेही त्यांच्याबरोबर होते.

डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात यतिंद्र यांच्यासह आपल्या काही विश्वासू सहकार्‍यांना स्थान मिळावे याबद्दल सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा केल्याचे समजते. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथे सुमारे तासभर ही चर्चा झाली.

यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल राहुल यांचे आभार मानले आणि पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे राजीनामा दिल्याचे सांगितल्याचे समजते. भविष्यातील योजना आणि कर्नाटकातील नव्या सरकारची स्थापना याबाबतही त्यांची चर्चा झाली. सिद्धरामय्या यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेऊन चर्चा केली.

शिवकुमार यांच्या गाठीभेटी

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वतंत्रपणे गाठीभेटी घेतल्या. शनिवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ‘‘सर्व आमदारांना बंगळुरूत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे,’’ असे शिवकुमार यांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांच्या सार्वजनिक जीवनात सातत्याने सन्मान, करुणा आणि सामाजिक न्यायासाठी धडपड दिसून येते. सामान्य परिस्थितीतून वर येऊन दोनदा मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी समानता, सौहार्द आणि वंचितांचे कल्याण यांच्याप्रति कटिबद्धता कायम राखली. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस.