Karnataka PWD Minister Satish Jarkiholi ED Raid: कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या देशभरातील विविध ठिकाणांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तब्बल २१ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ३.३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटांमध्ये झालेला कथित गैरव्यवहार आणि परदेशातील संशयास्पद गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचा दावा ‘ईडी’ने शुक्रवारी केला.

दरम्यान जारकीहोळी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन आणि परदेशातील अघोषित गुंतवणुकीच्या संशयावरून ९ आणि १० सप्टेंबर रोजी ही तपास मोहीम राबवण्यात आली. यामध्ये बंगळुरू, बेळगाव, गोकाक तसेच कोलकात्यातील २१ ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईदरम्यान ईडीने १५ लाख रुपयांचे परकीय चलन (अमेरिकी डॉलर आणि युरो), डिजिटल उपकरणे तसेच कंत्राटदारांकडून लाच घेतल्याचे दर्शवणारी अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.

कुटुंबीयांची आफ्रिकेतील कंपन्यांमध्ये भागीदारी

तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, सतीश जारकीहोळी यांची कन्या तथा चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, पुत्र राहुल जारकीहोळी आणि बहीण महादेवी मंजुनाथ यांची परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील ‘एल्डोराडो मायनिंग रिसोर्सेस’ आणि झांबियातील ‘नवा ऑरम मायनिंग लिमिटेड’ या कंपन्यांमधील त्यांच्या भागीदारीशी संबंधित कागदपत्रे ‘ईडी’च्या हाती लागली आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीत पुढे म्हटले की, काँगोमधील ‘मॅग्निट्यूड स्टार एसएआरएल’ या सोन्याच्या खाणकाम करणाऱ्या कंपनीत सतीश जारकीहोळी यांची सुमारे ४० टक्के भागीदारी असल्याचा संशय आहे. याशिवाय आफ्रिकेतील खाण व्यवसायाशी संबंधित इतर परदेशी कंपन्यांमध्ये अनधिकृत मार्गाने रोख गुंतवणूक व व्यवहार करण्यात आल्याचे पुरावेही तपास यंत्रणेला मिळाले आहेत.

कंत्राट घोटाळ्याचाही तपास

या कारवाईदरम्यान ‘भारत वाणिज्य ईस्टर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची कार्यालये आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही तपासणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राट मिळवण्यासाठी या कंपनीने मोठी लाच दिल्याचा आरोप असून, या लाचेचा पैसा परदेशातील मालमत्ता खरेदीसाठी वापरला गेला का? यादृष्टीने तपास सुरू आहे. याशिवाय जारकीहोळी यांचे मेहुणे वाय. डी. मंजुनाथ यांच्याशी संबंधित संस्थांमधूनही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सतीश जारकीहोळी काय म्हणाले?

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, “केंद्रीय यंत्रणा बड्या माशांना सोडून केवळ लहान माशांवर कारवाई करत आहेत. व्यवसायात प्रत्येकाकडून किरकोळ चुका होऊ शकतात, सर्वच व्यवहार १०० टक्के अचूक असतात असे नाही; परंतु केवळ काँग्रेस आणि प्रादेशिक विरोधी पक्षांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.”

काँग्रेसचा राजकीय सुडाचा आरोप

या कारवाईमुळे कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार राजकीय वाद पेटला आहे. ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, “जारकीहोळी यांच्यावरील ही कारवाई आश्चर्यकारक नाही. ते ज्येष्ठ नेते असून अनेक वर्षांपासून उद्योग-व्यवसायात सक्रिय आहेत. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसून, आम्ही याला कायदेशीर उत्तर देऊ.”

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही या कारवाईवरून केंद्रावर निशाणा साधला. दरम्यान, कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळुरू आणि गोकाक येथे निदर्शने केली.