Karnataka should have shown harmony Chief Minister Eknath Shinde explanation Belgaum ysh 95 | Loksatta

कर्नाटकने सामंजस्य दाखवायला हवे होते!; मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने खरेतर सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती.

कर्नाटकने सामंजस्य दाखवायला हवे होते!; मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

नवी दिल्ली: राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने खरेतर सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. पण, या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हे मंत्री सीमाभागांतील मराठी बांधवांची भेट घेणार असून राज्य सरकार मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.

दिल्ली दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आक्रमक भूमिकेवर भाष्य करणे टाळले. मात्र, ‘बेळगांवमध्येच नव्हे तर, देशाच्या कुठल्याही भागांमध्ये जायला कोणीही कोणाला रोखू शकत नाही’, असे स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे बोम्मई यांना चपराक दिली.  महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सीमाभागांत येऊ नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी इथे येण्याची योग्य वेळ नाही, असेही बोम्मई यांनी म्हटले आहे.

बेळगाव प्रश्नावर राज्य सरकार नेमस्त भूमिका घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्यावर, बेळगावसंदर्भात काही लोक मतप्रदर्शन करत आहेत, त्यांना एवढेच सांगायचे आहे की, आक्रमकपणा कसा दाखवायचा हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. मी बेळगावच्या प्रश्नावर ४० दिवस तुरुंगवास भोगला होता. ते मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) असताना बेळगावच्या जनतेला मिळणारे योजनांचे अनुदान बंद करण्यात आले होते. विद्यमान सरकारने संबंधित योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. सीमेवरील गावांसाठीही म्हैसाळ पाटबंधारे योजनेचे विस्तारीकरण केले जात आहे, त्यासाठी राज्य सरकार २ हजार कोटी देत आहे, असे शिंदे म्हणाले.

विराट मोर्चाला ‘शुभेच्छा’

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर, या पक्षांना विराट मोर्चासाठी शुभेच्छा आहेत असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

 भाजप नेत्यांच्या भेटीगाठी

शिंदे यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यासह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. राज्यातील विमानतळांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. कोळसा खाणींसंदर्भात प्रल्हाद जोशी यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मोदींच्या बैठकीला गैरहजर राहून काय साध्य केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिंदे सहभागी झाले. या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण दिले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. विकास प्रकल्प, उद्योग या मुद्दय़ांवरून आरोप-प्रत्यरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी गैरहजर राहून काय सिद्ध केले? हेच त्यांचे देशप्रेम आहे का? हेच राज्यावरील त्यांचे प्रेम आहे का? त्यांचे राज्यावरील बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसले. ‘जी-२०’चे यजमानपद देशाला मिळणे ही खरेतर गौरवाची बाब आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:45 IST
Next Story
गुजरातमध्ये पुन्हा भाजपच!; मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज : हिमाचलमध्ये चुरस