बंगळुरू : कर्नाटकात नुकत्याच राबवल्या केलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आणि त्यांचे कुटुंबीय, ‘झिरोदा’चे संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांची नावे नसल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची आई गौराम्मा यांचेही नाव प्रारूप यादीत नाही.
‘एसआयआर’चा पहिला टप्पा पार पडल्यानंतर प्रारूप मतदायादीसह नोटीस यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटीस यादीत अनेक प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आढळली आहेत. गौराम्मा यांचे नाव कनकपुरा विधानसभा मतदारसंघात नोंदवण्यात आले असून नावात विसंगती असल्यामुळे वगळण्यात आल्याचे वृत्त आहे.
झिरोदाचे कामत बंधू आणि त्यांची आई रेवती कामत यांची नावे वगळण्यामागील कारण पालकांचे नाव जुळत नाही असे आहे. या तिघांची नावे बंगळुरू दक्षिण विधानसभा मतदारसंघात होती. कन्नड अभिनेते शिवा राजकुमार यांचे नाव २००२च्या यादीशी मॅपिंग न झाल्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
मात्र, प्रसिद्ध व्यक्ती आणि व्हीआयपींना पडताळणी प्रक्रियेत अडचण येणार नाही, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. अशा व्यक्तींसाठी नोटीस काढण्यात आली असली तरी ती बजावलेली नाही. भारतरत्नने सन्मानित संशोधक प्रा. सी.एन.आर. राव आणि अभिनेता शिवराजकुमार यांचीही नावे प्रारूप मतदारयादीत नाहीत, त्यांनाही नोटीस बजावली गेलेली नाही. राव यांच्या नावातील प्रोफेसरच्या स्पेलिंगमध्ये एक एफ अधिक असल्यामुळे नाव विसंगत असल्याचे कारण देण्यात आले आहे.
संत्री विकून मुलांसाठी शाळा बांधणारे आणि या कामासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले हरेकाला हाजब्बा यांचेही नाव नोटीस यादीत आहे. हाजब्बा यांना मात्र नोटीस बजावण्यात आली आहे. कर्नाटकातील एसआयआरच्या पहिल्या टप्प्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये ४.४६ कोटी मतदारांची नावे असून नोटीस यादीमध्ये ४३.८१ लाख नावे आहेत.
‘आधार’ची कामगिरी ते नोटीस यादी नंदन निलेकणी, त्यांची पत्नी रोहिणी आणि मुले जान्हवी आणि निहार यांची नावे २००२च्या यादीबरोबर मॅपिंग न झाल्यामुळे प्रारूप यादीबाहेर आहे. विशेष म्हणजे, नंदन निलेकणी हे आधार कार्ड विकसित करणार्या ‘युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ २००९ ते २०१४ या कालावधीत संस्थापक अध्यक्ष होते.
