कर्नाटकमधील गोकाक तालुक्यात हिरे नदीजवळ कारने ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली असून या भीषण अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण हे सौंदत्ती तालुक्यातील रहिवासी असून नातेवाईकच्या अंत्यसंस्कारावरुन घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी आणि यरझरवी येथे राहणारे १४ जण गोकाक धबधबाजवळील गावात गेले होते. नातेवाईकाचे निधन झाल्याने तिथे गेले होते. सोमवारी रात्री सर्व जण कारमधून गावी परतण्यासाठी निघाले. गोकाक तालुक्यात संखेश्वर – नारगुंड महामार्गावर एका ट्रॅक्टरला त्यांच्या कारने धडक दिली. ऊसाने भरलेला ट्रॅक्टर थांबला होता. अंधारात कार चालकाला हा ट्रॅक्टर दिसला नाही आणि हा अपघात झाल्याचे समजते. ट्रॅक्टर चालकाने नियमांचे पालन केले नव्हते. ट्रॅक्टरच्या मागील लाईटही ऊसामुळे झाकले गेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.