देशातील विविध शहरांमध्ये दररोज हजारो प्रवाशी बसने प्रवास करत असतात. यावेळी अनेकदा बस कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये तिकिटासाठी लागणाऱ्या सुट्ट्या पैशांवरून वाद होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत. आता अशाच प्रकारच्या घटनेचा अनुभव थेट कर्नाटकच्या परिवहन मंत्र्यांना आला आहे. तिकिटासाठी लागणारे पैसे हे सुट्टे नसल्यामुळे कंडक्टरने थेट परिवहन मंत्र्यांना चालत्या बसमधून खाली उतरायला सांगितल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटकच्या बंगळुरू शहरात अनेक प्रवासांच्या बसच्या सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या वादाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नेमकं काय घडतंय? याचा अनुभव घेण्यासाठी कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी तोंडाला मास्क लावून सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे शनिवारी बसने प्रवास केला. मात्र, यावेळी मंत्री बायराथी सुरेश यांना धक्कादायक अनुभव आला.
यावेळी बस कंडक्टरने तिकीटाचे सुट्टे पैसे देण्याचे सांगितले. मात्र, मंत्री बायराथी सुरेश यांच्याकडे तिकीटासाठी सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी १०० रुपये दिले. मात्र, त्यानंतर बस कंडक्टरने त्यांना थेट बसच्या खाली उतरण्यास सांगितलं. प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी परिवहन मंत्र्यांनाही आल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी बसमधून मास्क लावून सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास केल्यामुळे त्यांना कंडक्टर ओळखू शकला नाही.
बस चालक आणि कंडक्टरवर कारवाई
तिकीटाचे सुट्टे पैसे न दिल्याने बस कंडक्टरने थेट मंत्री बायराथी सुरेश यांना चालत्या बसमधून खाली उतरण्यास सांगितल्याचा प्रकार घडला. एवढंच नाही तर याचवेळी एका बस स्टॉपवर प्रवाशी असूनही बस थांबली नसल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर दोन तासांतच संबंधित बस चालक आणि कंडक्टरला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी जवळपास २ तासांमध्ये वेगवेगळ्या १० पेक्षा जास्त बसमधून प्रवास केला आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आणि प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी अशाच प्रकारच्या अचानक तपासण्या सुरूच राहणार असल्याचं यावेळी मंत्री बायराथी सुरेश यांनी सांगितलं.
रिक्षा चालकाबाबतही धक्कादायक अनुभव
मंत्री बायराथी सुरेश यांना तिकीटाचे सुट्टे पैसे न दिल्याने बस कंडक्टरने थेट चालत्या बसमधून खाली उतरण्यास सांगितल्याचा प्रकार घडला. यानंतर मंत्री बायराथी सुरेश यांना एका रिक्षा चालकाबाबतही धक्कादायक अनुभव आला. बसमधून उतरल्यानंतर मंत्री बायराथी सुरेश यांनी एका ऑटो-रिक्षा चालक आणि प्रवाशाच्या वादात मध्यस्थी केली. यावेळी या रिक्षा चालकाने मीटरवर ३० रुपये भाडे दिसत असताना ३६ रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली.
