कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील सिरा परिसरात चार वर्षांपूर्वी घडलेल्या एका हत्येचा उलगडा बेपत्ता मेस्त्रीच्या शोधातून झाला. पोलिसांच्या तपासात धाकट्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या घराखाली पुरल्याचे समोर आले. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

दोन महिने बेपत्ता, पण कुटुंबाकडून वेगवेगळी माहिती

कमलनायकनहळ्ळी तांडा येथे राहणारा ४० वर्षीय रविचंद्रनाईक हा मेस्त्री (बांधकाम करणारा कामगार) होता. तो जवळपास दोन महिने बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, कुटुंबीयांकडून तो कामासाठी दुसरीकडे गेला असल्याच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जात होत्या. रविचंद्रनाईकच्या वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीसाठी त्याची स्वाक्षरी आवश्यक असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधण्याची गरज होती. त्यानंतर पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली.

पत्नी आणि मोठ्या भावाच्या संबंधाचा संशय

तपासादरम्यान पोलिसांना रविचंद्रनाईकची पत्नी सावित्रीबाई आणि त्याचा मोठा भाऊ राजा नाईक यांच्यात संबंध असल्याची माहिती मिळाली. एका नातेवाईकाने दोघांवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान सावित्रीबाईने रविचंद्रनाईकची हत्या झाल्याची माहिती दिली.

वादानंतर हत्या केल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, २ एप्रिल २०२२ रोजी रविचंद्रनाईक दारू पिऊन घरी परतला. पत्नीच्या आणि मोठ्या भावाच्या संबंधावरून त्याचा पत्नीशी वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर राजा नाईकने त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. रविचंद्रनाईक खाली पडल्यानंतर सावित्रीबाईने त्याचे हात-पाय पकडून ठेवले आणि राजा नाईकने त्याच्या छातीवर पाय ठेवून मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात रविचंद्रनाईकचा मृत्यू झाला.

बांधकाम चालू असलेल्या जागी मृतदेह लपवला

हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी तो घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील बांधकाम सुरू असलेल्या घराच्या जागेवर नेल्याचा आरोप आहे. ते घर राजा नाईकचे होते. तेथे बांधकामासाठी सुमारे पाच फूट खोल खड्डा आधीच खोदलेला होता. आरोपीने बांधकामासाठी मातीही मागवली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह खड्ड्यात टाकल्यानंतर सुमारे ४० ते ४५ ट्रॉली माती त्यावर टाकण्यात आली.

दोन महिन्यांनी जेसीबीने उघडले गुपित

रविचंद्रनाईक बेपत्ता झाल्यानंतर जवळपास दोन महिने कोणालाही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर पोलिसांचा संशय राजा नाईकच्या बांधकाम सुरू असलेल्या जागेकडे वळला. तहसीलदारांची परवानगी घेतल्यानंतर ३ जून २०२२ रोजी जेसीबीच्या मदतीने उत्खनन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात माती हटवल्यानंतर मानवी अवशेष सापडले. डॉक्टरांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आणि उत्खननाचे फोटो व व्हिडिओही घेण्यात आले.

डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली

अवशेषांची ओळख पटवण्यासाठी रविचंद्रनाईकच्या मुलाचा रक्ताचा नमुना घेऊन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला. डीएनए प्रोफाइल मृतदेहातून मिळालेल्या नमुन्याशी जुळल्याने ते अवशेष रविचंद्रनाईकचेच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्या मुलांच्या जबाबांनाही महत्त्वाचा पुरावा मानले. मुलांनी वडिलांना शेवटच्या दिवशी घरी पाहिल्याचे आणि त्यांचा वाद झाल्याचे सांगितले. त्यानंतर वडील पुन्हा घरी परतले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचे जबाब न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांसमोर सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत नोंदवण्यात आले. डीएनए आणि फॉरेन्सिक अहवालासह मुलांचे जबाब, पंचनामे, छायाचित्रे, शवविच्छेदन अहवाल आणि अन्य कागदपत्रे पोलिसांनी न्यायालयात सादर केली.

यापूर्वीही हत्या प्रकरणात आरोपी होता

तपासात राजा नाईक याच्यावर २०१९ मध्ये त्याच्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी हत्या प्रकरण दाखल झाल्याचेही समोर आले. मात्र, पुराव्याअभावी त्या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.