Karnataka VAO Exam cheating : कर्नाटकातील ग्राम प्रशासकीय अधिकारी पदाच्या भरती परीक्षेत हावेरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल आलेल्या उमेदवाराने परीक्षेदरम्यान गूगल लेन्सचा वापर करून प्रश्नांची उत्तरे शोधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंकर बन्नूर (वय ३१) असे या उमेदवाराचे नाव असून, पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केली. परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
बन्नूरने ४ ऑक्टोबर रोजी व्हीएओ पदासाठीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला २०० पैकी १५१ गुण मिळाले होते आणि त्यामुळे तो हावेरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आला. मात्र, त्याच्या निकालावर काही उमेदवारांनी सोशल मीडियावर शंका उपस्थित केली. कारण कर्नाटक राज्य राखीव पोलिस शिपाई भरती परीक्षेत त्याला १०० पैकी अवघे २५ गुण मिळाले होते. या दोन्ही परीक्षा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणानेच आयोजित केल्या होत्या.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोबाइलचा वापर कैद
सोशल मीडियावर उपस्थित झालेल्या शंकांनंतर केईएने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार शिग्गाव पोलिसांनी परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात बन्नूरने परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर केला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रात प्रवेश करताना बन्नूरकडे मोबाईल फोन होता. मात्र, केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड तपासून त्याला आत सोडले. त्यानंतर त्याने गुपचूप गूगल लेन्स ॲपच्या मदतीने प्रश्नपत्रिकेचे स्कॅनिंग केले आणि त्यातून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे ओएमआर उत्तरपत्रिकेवर पर्याय निवडले. त्याची जागा वर्गातील शेवटच्या बाकावर होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण कृती कैद झाली. मात्र, परीक्षा सुरू असताना कोणाच्याही लक्षात हा प्रकार आला नाही असे पोलिसांनी सांगितले.
बन्नूरची चौकशी करताना पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्यावेळी त्याने मोबाईल वापरल्याची कबुली दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी का झाली नाही आणि परीक्षेदरम्यान बन्नूर मोबाईलचा वापर करीत असल्याचे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही, याचाही तपास केला जाणार आहे. यासाठी केंद्रावरील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अटकेपूर्वी उमेदवाराने काय सांगितले होते?
पोलिसांनी अटक करण्याच्या काही तास आधी बन्नूरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. व्हीएओ परीक्षेत मिळालेले यश हे आपल्या मेहनतीचे फळ असल्याचा दावा त्याने केला होता. आपण २०१३ मध्ये पीयूसीची परीक्षा उत्तीर्ण झालो असून, सोशल मीडियावर २०२६ हे वर्ष नमूद करून केले जाणारे दावे चुकीचे असल्याचे त्याने सांगितले होते. कागदपत्रांमध्ये वेगळी नोंद का दिसत आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचेही त्याने म्हटले होते. आपली मूळ कागदपत्रे पोलिस आणि तहसीलदारांना दिल्याचा दावा त्याने केला.
आपली कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, शिक्षण घेत असताना हॉटेल आणि चित्रपटगृहांमध्ये काम केल्याचेही बन्नूरने सांगितले होते. आतापर्यंत ४५ हून अधिक स्पर्धा परीक्षा दिल्या असून, काही परीक्षांमध्ये मुलाखतीपर्यंत मजल मारली, तर काही ठिकाणी शारीरिक चाचणीत अपयश आल्याचे त्याने म्हटले होते.
दरम्यान, सोशल मीडियावर त्याच्या केएसआरपी परीक्षेतील गुणांची माहिती कशी पोहोचली, याबाबतही पोलिसांनी तपास केला. त्याच्या एका जवळच्या मित्राने परीक्षेचा निकाल लीक केल्यामुळे संशय निर्माण झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत
शिग्गाव पोलिसांनी बन्नूरविरोधात विश्वासभंग, फसवणूक, भरती परीक्षांमधील गैरप्रकार आणि दुसऱ्याचे रूप धारण करून फसवणूक केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कर्नाटकातील सरकारी पदांच्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगावर निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका फुटणे आणि भरती प्रक्रियेत लाचखोरी झाल्याच्या तक्रारींमुळे राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या विश्वासार्हतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
