बंगळूरु : व्हॉट्सअ‍ॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याच्या वादातून कर्नाटकमधील हुबळी येथे रविवारी हिंसाचार झाला असून पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे.हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त लाभू राम यांनी सांगितले की, २० तारखेच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत या शहरात फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या हुबळी पोलीस ठाण्याला अनेक लोकांनी घेराव घातला. अभिषेक हिरेमठ या व्यक्तीच्या अटकेची मागणी हा जमाव करीत होता. या व्यक्तीने प्रतिमेचे विद्रूपीकरण करून ती शनिवारी व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर उसळलेल्या हिंचाचारात चार पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. जमावाने पोलिसांच्या वाहनांची मोडतोड केली. या वेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडून हवेत गोळीबार केला.  या प्रकरणात पोलीस कारवाई करीत आहेत. कुणी कायदा हाती घेतला तर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.