Social Boycott Suicide Case Karnataka: कर्नाटकमध्ये यादगीर जिल्ह्यात एका ४६ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. समाजाच्या जात पंचायतीकडून कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गरोदर महिलेशी मुलाचे अनैतिक संबंध असल्याच्या आरोपावरुन समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. गावातील कोणीही त्यांच्याशी बोलत नव्हते शिवाय त्यांना मासेमारी आणि मासे विक्री करण्यासही बंदी घातली होती, अशी माहिती समोर आली आहे.

पुलावरुन घेतली उडी

यादगीर जिल्ह्यातील गिरीनगर येथे शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. ४६ वर्षीय महिलेने जोलादादगी पुलावरुन उडी घेत जीवनयात्रा समाप्त केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी रविवारी दुपारी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता. महिलेच्या मुलाचे गरोदर महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

दहा वर्षांसाठी बहिष्कार

सिल्लिक्यता समुदायाच्या पुढाऱ्यांनी महिलेच्या कुटुंबावर दहा वर्षांसाठी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला जात आहे. याच समुदायातील गरदोर महिलेसोबत महिलेच्या मुलाचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे, अशी माहिती वडगेरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मेहबूब अली यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली. 

घर आणि परिसर सोडून जाण्याचा आदेश

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जात पंचायतीने एक बैठक घेतली. या बैठकीत महिलेला घर आणि परिसर सोडून जाण्याचा आदेश केला. तसेच, भागातील कोणीच त्यांच्याशी बोलू नये असा फतवा काढला. कोणी संवाद साधलाच तर त्यांच्यावर देखील असाच बहिष्कार टाकला जाईल, असा दमही पुढाऱ्यांनी भरला. यामुळे कुटुंबावर अनेक बंधने आली. 

महिलेच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर चालत होता. पण, बैठकीत महिलेला मासेमारी करण्यास तसेच, मासे विक्री करण्यास बंदी घातली. यामुळे कुटुंबाचे एकमेव उत्पन्नाचे साधन बंद झाले. महिलेवर दंड देखील लादल्याचे पोलिसांनी सांगितले. पाण्यात उडी मारण्यापूर्वी महिलेने लग्नाची साखळी काढून पुलावर ठेवली, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

दोघेजण ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच आणखी तिघांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु आहे. घटनेचा तपास सुरु असल्याने पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केलेली नाहीत. वडगेरा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तपासानंतर आत्महत्येचे मुख्य कारण समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

सरकारकडून अद्याप कायदा नाही

कर्नाटक सरकारने सामाजिक बहिष्कारविरोधात २०२५ मध्ये विधेयक मांडले आहे. पण, सरकारकडून अद्याप ते लागू करण्यात आलेले नाही. या विधेयकात सामाजिक बहिष्कारविरोधात शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, तीन वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरदूत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.