Karoline Leavitt baby news Iran reaction: व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या मुलीच्या जन्माची बातमी शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मुलीचा फोटो शेअर करत तिच्या नावाचाही खुलासा केला.
लेविट नेमकं काय म्हणाल्या होत्या?
“१ मे रोजी, व्हिव्हियाना उर्फ ‘व्हिव्ही’ आमच्या कुटुंबात सामील झाली, आणि आमची मने प्रेमाने ओंसडून गेली. ती परफेक्ट आणि निरोगी आहे आणि तिचा थोरला भाऊ सुद्धा आपल्या लहान बहिणीबरोबर आनंदाने जुळवून घेत आहे. आम्ही आमच्या नवजात बाळाच्या आनंददायी विश्वातील या प्रत्येक क्षणांचा आनंद लुटत आहोत,” असे लेविट यांनी लिहिले.
या पोस्टच्या एका दिवसानंतर या पोस्टवर इराणकडून तिखट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आपल्या संदेशात इराणकडून अमेरिका-इस्रायल यांच्याबरोबरच्या संघर्षात मिनाब येथे शाळकरी मुलांच्या हत्येचा संदर्भ देण्यात आला आहे.
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाला २० फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती, त्याच दिवशी इराणमधील मिनाब येथील एक शाळा उद्ध्वस्त झाली होती. इराणने असा आरोप केला आहे की, अमेरिकेने केलेल्या त्या हल्ल्यात पाच ते सात वर्षे वयोगटातील १६० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला.
अर्मेनियामधील इराणच्या दूतावासाने लेविट यांची एक्सवरील पोस्ट रिपोस्ट करत लिहिले की, “तुमचे अभिनंदन. मुले निष्पाप आणि प्रिय असतात. तुमच्या बॉसने मिनाबमधील शाळेत ज्या १६८ मुलांची हत्या केली आणि तुम्ही ज्याचे समर्थन केले, तीही मुलेच होती. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचे चुंबन घ्याल, तेव्हा त्या मुलांच्या मातांचाही विचार करा.” ही बातमी लिहिपर्यंत लेविट यांनी यावर जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान दुसरीकडे, गेल्या काही दिवसांच्या संघर्षानंतर रविवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात शांतता होती. सध्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता वाटाघाटी सुरू करण्यासाठी अमेरिकेने देलेल्या प्रस्तावावर इराण काय प्रतिसाद देणार याची अमेरिकेकडून वाट पाहिली जात आहे.
