आपले कनिष्ठ चिरंजीव आणि पक्षाचे खजिनदार एम.के. स्टॅलिन हेच आपले पुढील वारसदार असल्याचे संकेत द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी गुरुवारी येथे दिले. समाजाच्या विकासासाठी आपण अखेपर्यंत लढणार आहोत. त्यामुळे आपल्यानंतर कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर तुमच्यातच बसलेला ‘स्टॅलिन’ हेच आहे आणि ही बाब तुम्ही कदापि विसरता कामा नये, असे करुणानिधी यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
करुणानिधी हे आता ८८ वर्षांचे आहेत. पीएमकेच्या दोन हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात करुणानिधी यांनी हे स्पष्ट संकेत दिल्यामुळे द्रमुकमधील अंतर्गत पक्षस्पर्धेस आता कोणते वळण लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. करुणानिधी यांच्या या घोषणेस उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. करुणानिधी यांनी याआधीही स्टॅलिन यांच्यासंबंधी संकेत दिले होते. तेव्हा हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर स्टॅलिन यांचे कडवे विरोधक आणि करुणानिधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव एम.के. अलगिरी यांच्यातील वाद उफाळून आला होता. मात्र, २०११ मध्ये निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर स्टॅलिन यांचे पक्षातील वर्चस्व लक्षणीयरीत्या वाढले होते. त्यांना पक्षामध्ये मोठे स्थान देण्यात आले होते तसेच २००९ मध्ये ते उपमुख्यमंत्रीही झाल्यानंतर तेच करुणानिधींचे वारसदार ठरतील, याचे स्पष्ट संकेत तेव्हाही मिळाले होते.