Kash Patel : भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक काश पटेल हे सध्या अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयचे संचालक आहेत. काश पटेल हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, हेच काश पटेल कोणत्या न कोणत्या कारणांवरून कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या प्रशासनातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता आणि त्यामुळे एफबीआय संचालक काश पटेल यांची हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता काश पटेल हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काश पटेल यांच्या एका दौऱ्याची मोठी चर्चा सुरू आहे.

काश पटेल यांनी त्यांच्या एका सरकारी दौऱ्यात सरकारच्या साधनसामुग्रीचा गैरवापर केल्याचा दावा केला जात आहे. काश पटेल यांनी ते एका दौऱ्यावर असताना त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर आलिशान डेटसाठी सरकारी जेटचा वापर, ३५ ते ५० हजार डॉलरचा सुइट आणि व्हीआयपी स्नॉर्कलिंगसह काही कॉन्सर्ट पाहिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काश पटेल यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात येत असल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, काश पटेल यांच्यावर नेमकं काय आरोप करण्यात येत आहेत? काश पटेल हे वादाच्या भोवऱ्यात का अडकले? याबाबत एफबीआयने काय म्हटलं आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काश पटेल वादात का अडकले?

एफबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्यापासून काश पटेल हे सातत्याने कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत आहेत. यातच आता नवीन वाद म्हणजे सरकारी दौऱ्यादरम्यान आलिशान डेटसाठी सरकारी जेटचा वापर करणं आणि पर्ल हार्बरमधील व्हीआयपी स्नॉर्कलिंगला जाणं, ५० हजार डॉलरचा सुइट वापरणं आणि गर्लफ्रेंडबरोबर आलिशान जीवनशैली जगणं, या मुद्यांवरून काश पटेल हे वादात अडकले आहेत. अमेरिकेतील माध्यमांच्या हवाल्याने या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, १० मे रोजी काश पटेल आणि त्यांची गर्लफ्रेंड एलेक्सिस विल्किंस एका म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी एफबीआयच्या गल्फस्ट्रीम व्ही जेटने वॉशिंग्टनवरून फिलाडेल्फियाला गेले होते. यावेळी या जोडप्याने फिलाडेल्फियाच्या लिंकन फायनान्शिअल फील्डमधील एका खासगी सुइटमधून हा कार्यक्रम पाहिला. ज्याचं भाडं साधारणपणे ३५ हजार ते ५० हजार डॉलर्सच्या आसपास होतं.

Kash Patel

दरम्यान, एफबीआयचे प्रवक्ते बेन विल्यमसन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, एलेक्सिस विल्किंस यांना कलाकारांनी आमंत्रित केलं होतं. तसेच काश पटेल यांनी यासाठी कोणी निधी पुरवला या प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार दिला. तसेच काही महिन्यांनंतर काश पटेल हे एलेक्सिस विल्किंस यांच्या संगीत कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी व्हर्जिनियातील मनासास प्रादेशिक विमानतळावरून एका विमानाने उड्डाण करून पेनसिल्व्हेनियातील स्टेट कॉलेज प्रादेशिक विमानतळावर उतरले होते. सुमारे अडीच तासांनंतर तेच विमान एलेक्सिस विल्किंस या राहत असलेल्या नॅशविल या शहरात गेल्याचं वृत्त आहे. या काळात विमान कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अतिरिक्त कामाचा मोबदला घेतल्याच्याही चर्चा आहेत.

एफबीआयच्या धोरणानुसार संचालकांना सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत विमानांचा वापर करणं आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही वैयक्तिक प्रवासाचा खर्च व्यावसायिक दराने परत करणंही बंधनकारक आहे. यापूर्वीही काश पटेल यांच्यावर वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी विमानाचा अतिवापर केल्याचा आरोप झाला होता. तेव्हा काश पटेल यांनी म्हटलं होतं की, “सर्व प्रवासासाठी सरकारी विमानांचा वापर करणं काँग्रेसने अनिवार्य केलं आहे.”

गर्लफ्रेंडच्या उपस्थितीमुळे अनेक प्रश्न

दरम्यान, मागच्या वर्षी एका हवाई दौऱ्यावर असताना काश पटेल आणि इतर ९ जणांनी नेव्ही सील्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन बोटींचा वापर करून पर्ल हार्बरजवळ ‘व्हीआयपी स्नॉर्कलिंग’ केलं होतं. काश पटेल यांच्या आदेशानुसार केलेल्या अनेक प्रवासांमध्ये आणि संबंधित व्यवस्थांमध्ये त्यांची गर्लफ्रेंड एलेक्सिस विल्किंस यांचा समावेश होता. एवढंच नाही तर गेल्या महिन्यांत पेनसिल्व्हेनियामध्ये अमली पदार्थांच्या तस्करीवर झालेल्या एका बंद दाराआडच्या बैठकीचाही समावेश होता. पटेल आणि एफबीआय अधिकारी रणनीतीवर चर्चा करत असताना आणि अमली पदार्थांच्या संकटामुळे आपलं सदस्य गमावलेल्या कुटुंबांची साक्ष ऐकत असताना त्या टेबलाच्या मुख्य स्थानी विल्किंस बसल्या होत्या.

दरम्यान, एलेक्सिस विल्किंस यांनी याबाबत म्हटलं की, त्या फेंटॅनिल आणि एंजल फॅमिलीज सोबत काम करत असल्यामुळे त्या बैठकीला उपस्थित होत्या. विल्किंस यांना पूर्णवेळ सुरक्षा पथकही पुरवलं जातं. तसेच विल्किंस यांना मिळणाऱ्या सततच्या, गंभीर धमक्यांचा उल्लेख करून पटेल यांनी त्याचं समर्थन केलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

Kash Patel

काश पटेल कोण आहेत?

काश पटेल यांचं भारताशी खास नातं राहिलं आहे. त्यांचे आई-वडील हे गुजरातहून न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. दोघे आधी कॅनडा येथे राहिले नंतर १९७० मध्ये अमेरिकेत गेले. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या काश पटेल यांनी आपल्या गुजराती ओळख कायम अभिमानाने जाहीर केली आहे. काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठ आणि पेस यूनीव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ येथून कायद्याची पदवी घेतली आहे. काश पटेल यांनी २०१७ मध्ये तात्कालीन ट्रम्प प्रशासनात शेवटचे काही दिवस चीफ ऑफ स्टाफ म्हणून देखील काम केलं होतं.