पीटीआय, चेन्नई : ‘‘काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थानाच्या मूळ स्थानावर पुन्हा हक्क सांगण्यासाठी विश्व हिंदु परिषद (विहिंप) वचनबद्ध आहे. घटनात्मक मार्गाने आम्ही हे प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल,’’ असे विश्व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी शनिवारी सांगितले. आलोक कुमार म्हणाले, की विश्व हिंदु परिषद कायद्याच्या चौकटीत शांततापूर्ण मार्गाने काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थानाच्या मूळ जागेवर पुन्हा दावा करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांचीपुरम येथे आयोजित विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यांचा निषेधार्थ झालेल्या हिंसाचारात देशातील ठिकठिकाणी मालमत्ता, सरकारी संस्थांचे नुकसान झाले तसेच पोलिसांवर झालेले हल्ले निषेधार्ह आहेत. शत्रू देश आणि काही देशद्रोही गटांच्या अपप्रचारामुळे कट्टरपंथीयांनी शर्मा व जिंदाल यांचा शिरच्छेद करण्याची, हिंदुंच्या मालमत्तेची हानी आणि रस्त्यावर हिंसाचाराची धमकी दिली. विश्व हिंदु परिषद अशा घृणास्पद कृत्यांचा निषेध करते. भारताचा राज्यकारभार शरिया कायद्यानुसार नव्हे तर राज्यघटनेद्वारे चालतो. कोणत्याही जमावाला कोणालाही दोषी घोषित करण्याचा अधिकार नाही.

मंदिरांना संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप आपले आंदोलन अधिक तीव्र करेल, असा निर्धारही आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.

हिंदु मंदिरांचा महसूल केवळ हिंदुहितासाठी वापरावा

मंदिरांना मिळणारा महसूल सरकारी-प्रशासकीय खर्चासाठी न वापरता केवळ हिंदु मंदिरांच्या देखभालीसाठी आणि हिंदु कल्याणार्थ वापरला जावा, अशी मागणी करून कुमार म्हणाले, की हिंदु मंदिरांचे व्यवस्थापन काही राज्य सरकार करत आहेत, ही खेदाची बाब आहे. तामिळनाडूतील हिंदु मंदिरांमधील देवतांच्या तोडफोडीच्या घटनांचा त्यांनी तीव्र निषेध केला. नशेत असलेल्या व्यक्तींनी ही तोडफोड केल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. त्यामागे नियोजित कट आहे. तामिळनाडू सरकारने खऱ्या दोषींवर कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashi claim birthplace lord krishna role vishwa hindu parishad ysh
First published on: 26-06-2022 at 00:02 IST