जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३५ ए वरील आव्हान याचिकांची सुनावणी उद्या (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात होत असून त्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. फुटीरतावाद्यांनी या सुनावणीविरोधात बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे सगळे जनजीवन ठप्प झाले. कलम ३५ ए अन्वये जम्मू काश्मीरच्या बाहेरील कुठल्याही व्यक्तीला राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही. खोऱ्यातील परिस्थिती शांततापूर्ण असून अद्याप कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. काश्मीर खोऱ्यात सर्व दुकाने व आस्थापने बंद होती तर सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली होती. जॉइंट रेझिस्टन्स लीडरशिप या संघटनेने दोन दिवसांच्या काश्मीर बंदचे आवाहन केले असून तो आज व उद्या असा दोन दिवस चालणार आहे. कलम ३५ ए च्या वैधतेला आव्हान देण्यात आले असून त्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. राज्य सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे अर्ज दाखल केला असून काश्मीरमध्ये पंचायत व पालिका निवडणुका होत असल्याने या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की काश्मीर खोऱ्यात सगळीकडे कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. बार असोसिएशन तसेच व्यापारी संघटना यांनी बंदला पाठिंबा दिला असून सय्यद अली शहा गिलानी, मिरवैझ उमर फारूख व महंमद यासिन मलिक यांनी बंदचे आवाहन केले होते. काश्मीरध्ये गेले काही दिवस या मुद्दय़ावर निदर्शने चालू असून कलम ३५ ए कायम ठेवावे, यासाठी पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्स यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. जम्मूमध्ये अमरनाथ यात्रा स्थगित काश्मीरमध्ये देशाच्या इतर भागातील कुणालाही स्थावर मालमत्ता खरेदीस बंदी करणाऱ्या कलम ३५ ए च्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने काश्मीरमध्ये बंद पुकारण्यात आला असून खबरदारीची उपाययोजना म्हणून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दोन दिवस फुटीरतावाद्यांनी काश्मीर बंदचे आवाहन केले आहे. रामबन, दोडा व किश्तवार या चिनाब खोऱ्यातील जिल्ह्य़ांमध्ये कलम ३५ एच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आल्याच्या बातम्या आहेत. विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की जम्मूत अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून जॉइंट रेझिस्टन्स लीडरशिप या संघटनेने बंदचे आवाहन केले आहे. जम्मूत हजारो भाविक अमरनाथ यात्रेसाठी मुक्कामाला असून त्यांना भागवतीनगर तळावर जाण्यास मज्जाव करून आहे तिथेच राहू देण्यात आले. फुटीरतावादी व प्रमुख राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला असून त्यात नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, माकप, काँग्रेस यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३५ ए च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या लोकहिताच्या याचिकेवर उद्या म्हणजे सोमवारी सुनावणी करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे अर्ज करून याचिकेवरील सुनावणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. गुल, सांगलदान, बनीहाल या भागात लोकांनी कलम ३५ ए च्या समर्थनार्थ शांततामय मोर्चे काढले. वाहतूक पूर्ण बंद होती. लष्कराच्या गोळीबारात गुरांचा व्यापारी ठार जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्य़ात लष्कराने केलेल्या गोळीबारात एक गुरांचा व्यापारी ठार तर आणखी एक जण जखमी झाला आहे. महंमद रफीक गुज्जर (वय २८) असे मरण पावलेल्याचे नाव असून तो व शकील अहमद (वय ३०) हे दोघे गुल येथील रहिवासी असून त्यांच्यावर लष्कराच्या ५८ राष्ट्रीय रायफल्सने गोळीबार केला. ते पहाटे चार वाजता कोहली खेडय़ातून बाहेर पडत असताना त्या दोघांवर गोळीबार करण्यात आला. त्यात गुज्जर हा जागीच ठार झाला असून अहमद याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. दोघेही गुरांचे व्यापारी होते व ते त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने कोहली गावात आले होते. रामबनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले, की गुज्जर हा गोळीबारात मारला गेल्याचे वृत्त खरे आहे. दुसरा एक जण गोळीबारात जखमी झाला असून या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. या घटनेची प्राथमिक चौकशी करून लष्कराच्या जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले, की काही लोकांची संशयास्पद हालचाल दिसल्याने जवानांनी गोळीबार केला त्यातून हा प्रकार घडला आहे. आम्ही या घटनेची चौकशी करीत आहोत व त्याची सविस्तर माहिती घेतली जाईल.