भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहा ते बारा दहशतवाद्यांच्या यादी तयार केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दहा ते बारा दहशतवाद्यांची नावे लष्कराच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कमांडर सबझार अहमद मारला गेला. गेल्या वर्षी जुलैमध्ये बुरहान वानी मारला गेल्यानंतर अहमदनेच हिजबुलची धुरा सांभाळली होती. आता आणखी दहा ते बारा दहशतवादी लष्कराच्या निशाण्यावर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराने या दहा ते बारा दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा निर्धार केला आहे. त्यात १० दहशतवादी काश्मिरी असून, दोन पाकिस्तानी आहेत. हे सर्व सध्या काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी जुलै २०१६ पासून आतापर्यंत बुरहान वानी, सबझारसह त्यांच्या आठ साथीदारांना कंठस्नान घातले आहे.

– अबु दोजाना उर्फ हाफिज:

पाकिस्तानी दहशतवादी अबु दोजाना लष्कर – ए-तोयबाशी जोडलेला आहे. तो दक्षिण काश्मीरमधील विभागीय कमांडर आहे. तो २०१४ पासून सक्रिय असून सर्वाधिक क्रूर दहशतवाद्यांच्या यादीत ए++ श्रेणीत समावेश केला आहे. गेल्या आठवड्यात तो सुरक्षा दलाच्या कारवाईतून थोडक्यात बचावला होता.

जाकिर रशीद भट्ट उर्फ मूसा:

मूसा हा दक्षिण काश्मीरमधील माजी विभागीय कमांडर असून, हिजबुलकडून अपेक्षाभंग झाल्याने तो सध्या नाराज आहे. त्याच्यामुळेच भारतीय लष्कराला सबझारविषयी माहिती मिळाली होती.

अबु हमास : हा पाकिस्तानी नागरीक आहे. २०१६ पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला आहे. तो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आहे.

शौकत अहमद हुजैफा: लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असून पुलवामात तो सक्रिय आहे.

अल्ताफ अहमद डार उर्फ कचरू: हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर असून तो कुलगाममध्ये सक्रिय आहे.

जुनैद अहमद मट्टू: लष्कर -ए-तोयबाचा दहशतवादी असून जून २०१५ पासून तो सक्रिय आहे.

रियाज अहमद नाईकू उर्फ जुबैर: हिजबुल मुजाहिद्दीनचा पुलवामातील कमांडर आहे. सबझार मारला गेल्यानंतर हिजबुलची धुरा त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

सद्दाम पद्दार उर्फ जैद: दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये हिजबुलचा कमांडर म्हणून तो कार्यरत आहे. २०१५ पासून तो सक्रिय आहे.

वसीम अहमद उर्फ ओसामा: तो शोपियानमधील आहे. २०१४ पासून तो सक्रिय आहे. लष्कर – ए-तोयबाचा तो कमांडर आहे.

बशीर अहमद वानी उर्फ लष्कर : अनंतनागमधील लष्कर – ए-तोयबाचा तो जिल्हा कमांडर आहे. २०१५ पासून सक्रिय आहे.

जीनत – उल-इस्लाम उर्फ अलकामा: हा शोपियानमधील आहे. नोव्हेंबर २०१५ पासून सक्रिय आहे.

मोहम्मद यासीन इत्तू उर्फ मन्सूर: हा बडगामचा रहिवासी आहे. हिजबुलचा जिल्हा कमांडर आहे.