काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या आक्रमणामुळे रण पेटलेले असताना पंतप्रधान मोदी यांनी मात्र राज्यांच्या निवडणूक प्रचारातच रस घेतला, असा आक्षेप नोंदवत काँग्रेसने ‘पंतप्रधानांच्या दिल्लीतील  गैरहजेरी’वर शरसंधान केले. तसेच केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या असहकार्याबद्दल काँग्रेसवर टीका केली खरी मात्र सरकारने विरोधी पक्षाला शस्त्रसंधीभंगाच्या घटनांबाबात विश्वासातच घेतलेले नाही, असा आरोपही काँग्रेसने केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वावरच अंकुष ठेवायचा असतो. त्यामुळे नियोजितरीत्या किंवा स्वाभाविकपणे भारतीय पंतप्रधान अत्यंत कसोटीच्या क्षणी ‘गैरहजर’ असतात. उलट अशा मोक्याच्या प्रसंगी आपण प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहोत, असे भासविण्याचा त्यांचा अट्टहास असतो अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली.संरक्षणमंत्री बोलले हेच खूप झाले. गेले काही दिवस सीमेवर दुर्धर प्रसंग ओढवला असताना केंद्रात ना पंतप्रधानांचे अस्तित्व होते ना संरक्षणमंत्र्यांचे. भारताला ‘अर्धवेळ संरक्षणमंत्री’ परवडणारा नाही, अशा शब्दांत शर्मा यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
संरक्षणमंत्र्यांची टीका
सीमा सुरक्षा दलाच्या सुमारे ७० चौक्यांवर रात्री पावणेनऊ वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा करण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकारची चिथावणी नसताना हा हल्ला करण्यात आला. जर सीमेवर पाकिस्तानला शांतता हवी असेल तर असे हल्ले थांबवावेत, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला सुनावले.