Widow Gold Donation Iran Viral Video: गेल्या तीन आठवड्यांपासून इराणचा अमेरिका आणि इस्रायलविरोधात संघर्ष सुरु आहे. हवाई हल्ले, क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. युद्धग्रस्त इराणला भारताकडून मदतीचा हात दिला जात आहे. गेल्याच आठवड्यात भारताकडून इराणला वैद्यकीय मदत पाठविण्यात आली. इराणला मदत पाठविण्यासाठी काश्मीरमधून नागरिक पुढे सरसावले आहेत. काश्मीरमधून नागरिकांना रोख रक्कम, सोनं आणि घरात उपयोगी पडणारे साहित्य देखील मदत म्हणून पाठवले आहेत.
विधवा महिलेकडून दागिन्यांची मदत
इराणला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत पाठविण्यासाठी नागरिक पुढे येत असताना. काश्मीरमधून एक भावनिक प्रसंग समोर आला आहे. एका विधवा महिलेने गेल्या तीन दशकांपासून जपून ठेवलेले सोन्याचे दागिने इराणला मदत म्हणून देऊ केले आहेत. भारतातील इराणी दूतावासाने या महिलेचे व्हिडीओ एक्सवरुन शेअर केला आहे. विशेष म्हणून महिलेच्या पतीने दिलेल्या या दागिन्याचे अतिशय भावनिक नाते असल्याचे महिलेने सांगितले. २८ वर्षापासून पतीचे निधन झाल्यापासून महिलेने हा दागिना जपून ठेवला होता.
इराणकडून भारतीय नागरिकांचे आभार
“तुमचे अश्रू आणि पवित्र भावना आम्हाला पाठबळ देणारे स्त्रोत आहेत”, अशा शब्दात दूतावासाने त्या महिलेचे आणि भारतीय नागरिकांचे मदतीसाठी आभार मानले. बडगाम येथील शिया समुदाय अधिक असलेल्या भागातून इराणसाठी मदतीचा ओघ वाढला आहे. अनेक ठिकाणी इराणला मदत पाठविण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. नागरिकांना या ठिकाणी मदत म्हणून रोख रक्कम, दागिने यासह विविध वस्तू देत आहेत.
मदत देण्यासाठी स्टॉल
आमच्या येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर स्टॉलला भेट देऊन मदत जमा करत आहेत. कोणी आवश्यक वस्तू, पैशे तर कोणी दागिने मदत म्हणून जमा करत आहेत, असे बडगाम येथे स्टॉल लावलेल्या मोहसीन अली यांनी सांगितले. महिला, पुरुष लहान – मोठे सर्वच मदत देण्यासाठी पुढे येत आहेत. लहान मुलांनी बचत केलेले पैसे देखील मदत म्हणून दिले आहेत. ईदच्या निमित्ताने अनेकांनी विविध स्वरुपात दान दिले, असे मोहसीन सांगतात.
मदतीचे आवाहन
इराणी दूतावासाने देखील मदतीसाठी बँक खात्याचा तपशील सार्वजनिक केल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय नागरिकांना दूतावासाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मदतीचा ओघ सुरु झाल्यानंतर इराणी दूतावासाने भारतीय नागरिकांचे आभार मानले आहेत. अमेरिका – इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष आता चौथ्या आठवड्यात प्रवेश केला असून, युद्ध समाप्त होण्याचे अद्याप कोणतेही संकेत दिसत नाहीयेत. चर्चेचे प्रस्तावर धुडकावले जात असून, संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
