जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सीआयएसएफच्या (CISF) एका जवानाने आपल्याच सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत चार जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या घटनेमुळे लष्करी व सुरक्षा यंत्रणेसह संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कठुआ जिल्ह्यातील बसोली भागात असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या कॅम्पमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. या ठिकाणी तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानांमध्ये झालेल्या कथित वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत चार सीआयएसएफ जवानांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका असिस्टंट कमांडंट अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

वृत्तानुसार, सीआयएसएफ जवानांवर गोळीबार करणाऱ्या जवानाबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी घडल्याची माहिती सांगितली जात आहे.

सीआयएसएफचे हे जवान बसोली येथील माश्का गावात असलेल्या सेवा-३ या वीज प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात होते. यावेळी दोन सीआयएसएफ जवानांमध्ये एका मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यातील एकाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान, आता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेच्या अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सीआयएसएफकडून चौकशीचे आदेश

सीआयएसएफकडूनही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचा घटनाक्रम आणि गोळीबारास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी सीआयएसएफच्या मुख्यालयाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत. दरम्यान, वादाचं नेमकं कारण आणि गोळीबारास कारणीभूत ठरलेली परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.