भारतीय जनता पार्टीने जम्मू-काश्मीरमधील आपल्या सर्वच्या सर्व नऊ मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगितले आहेत. या घडामोडीमुळे भाजपा-पीडीपी आघाडी सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसून या निमित्ताने भाजपा मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे. या संभाव्य बदलांबद्दल बोलताना भाजपा नेत्याने सांगितले कि, पक्षाला नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असून जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या विकासासाठी काम करायचे आहे.

चंद्र प्रकाश गंगा आणि चौधरी लाल सिंह या दोन मंत्र्यांनी आपले राजीनामे आधीच प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. कठुआ बलात्कार प्रकरणामुळे या दोघांना आपले मंत्रिपद गमवावे लागणार आहे. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या बचावासाठी हिंदू एकता मंचने काढलेल्या रॅलीमध्ये हे दोन्ही मंत्री सहभागी झाले होते. कठुआ बलात्कार प्रकरणात भाजपाचे मंत्रीच आरोपींचा बचाव करत असल्याचा संदेश गेल्याने पक्षाने या दोघांचे राजीनामे घेतले आहेत.

पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी लाल सिंहने आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी लाल सिंहने केली आहे. शांततेसाठी दोन मंत्री आपल्या पदाचा त्याग करतात तर ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांनी सुद्धा अंत:करणाचा आवाज ऐकून राजीनामा दिला पाहिजे असे लाल सिंह म्हणाले.