व्हाइट हाऊसमध्ये आयोजित केलेली ही पत्रकार परिषद केवळ १४ मिनिटांत घाईघाईने आटोपण्यात आली. केटी जकारिया यांनी कॅरोलिन लेव्हिट यांच्या जागी प्रेस सेक्रेटरी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. कौटुंबिक कारणांमुळे आणि मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने लेव्हिट यांनी ऑगस्ट महिन्यात या पदाचा राजीनामा दिला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्हाइट हाऊस प्रेस सेक्रेटरी केटी जकारिया यांची पहिलीच पत्रकार परिषद सध्या तुफान चर्चेत आली आहे. पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी त्यांच्या पती ऐवजी थेट अध्यक्ष ट्रम्प यांचा उल्लेख केला. हा प्रकार लक्षात येताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?

पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने केटी यांना प्रश्न विचारला, “चार लहान मुलांचा सांभाळ करत व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी पदाची मोठी जबाबदारी तुम्ही कशी सांभाळणार?”

यावर उत्तर देताना केटी म्हणाल्या, “माझ्या मुलांसोबत संध्याकाळचा वेळ न घालवणे ही कल्पनाच मला मान्य नाही. म्हणूनच माझे अध्यक्ष… अरे माफ करा, माझे पती इथेच आहेत.” केटी यांच्या तोंडून ‘पती’ ऐवजी ‘अध्यक्ष’ हा शब्द निघताच पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधींमध्ये हशा पिकला.

आपली फजिती झाल्याचे लक्षात येताच केटी यांनी “हा चांगला विनोद झाला”, असे म्हणत परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी ट्रम्प यांचे कौतुक करत, चार मुलांची आई असलेल्या महिलेला एवढ्या मोठ्या पदावर संधी देऊन ट्रम्प यांनी नोकरदार महिलांना पाठिंबा दर्शवला असल्याचे सांगितले. आपल्या कुटुंबासह त्या लवकरच कॅलिफोर्नियाहून वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थलांतरित होणार आहेत.

केवळ १४ मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली

‘ॲसोसिएटेड प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, केटी यांनी सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऊर्जा, आयात शुल्क, घुसखोरीविरोधी धोरणे आणि आगामी मध्यवर्ती निवडणुकांच्या प्रचारावर भाष्य केले. “ट्रम्प हे स्वतःच त्यांचे सर्वोत्तम वक्ते आहेत आणि त्यांचे धोरण अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे काम आहे,” असे त्या म्हणाल्या.

मात्र, ही पत्रकार परिषद अवघ्या १४ मिनिटांत संपल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. केटी यांनी केवळ तीन प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि अचानक पत्रकार परिषद थांबवली.

पत्रकार परिषद अचानक संपवण्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, “अध्यक्ष ट्रम्प अलास्का दौऱ्यासाठी ‘मरीन वन’ (अमेरिकन अध्यक्षांचे हेलिकॉप्टर) कडे निघाले आहेत, त्यामुळे तुम्ही उरलेले प्रश्न थेट त्यांनाच विचारा.”

विशेष म्हणजे, ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचा अलास्का दौरा त्यानंतर काही तासांनी नियोजित होता. त्यामुळेच केटी यांनी पत्रकार परिषदेतील गोंधळ टाळण्यासाठी घाईघाईत पत्रकार परिषद संपवली का, अशी चर्चा आता अमेरिकन राजकीय वर्तुळात रंगली आहे.