Kavita Kumari Home Guard Bharti Running Video: कंबरेला खोचलेली साडी, पायातील चप्पल बाजूला भिरकावून अनवाणी पायांनी १६०० मीटरची शर्यत पूर्ण करण्यासाठी मैदानात जीवाच्या आकांताने धावणारी एक महिला… ती जशी एकेका उमेदवाराला मागे टाकत पुढे निघून गेली, तसा संपूर्ण मैदानात टाळ्या आणि शिट्ट्यांचा एकच कल्लोळ उठला. होमगार्ड भरतीपूर्व चाचणीदरम्यानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील सोसो गावातील रहिवासी कविता कुमारी यांच्या संघर्षाची कथा आता समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर कविता यांच्या कुटुंबासाठी होमगार्डची नोकरी केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून त्यांच्या कुटुंबाला आधार देणारी संजीवनी आहे.

ट्रॅकसूटच्या गर्दीत साडी नेसून धावणारी कविता

द इंडियन एक्सप्रेसने कविता यांच्या संघर्षाबद्दलचा सविस्तर लेख प्रकाशित केला आहे. कविता यांचा दिवस रामगढमधील खडबडीत, दगडधोंड्यांच्या जमिनीवर पहाटे धावण्याचा सराव करून सुरू होतो. येत्या २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान रामगढच्या सिद्धू-कान्हू स्टेडियमवर होमगार्ड भरतीची मैदानी चाचणी होणार आहे. भरतीपूर्वी मैदानाची ओळख व्हावी आणि आपल्या क्षमतेचा अंदाज यावा म्हणून एका स्थानिक ॲथलेटिक्स अकादमीने ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारांसाठी मोफत सराव चाचणी (ट्रायल रन) आयोजित केली होती.

या सरावासाठी साधी साडी आणि पायात चप्पल घालून आलेल्या कविता सुरुवातीला संकोचल्या होत्या. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “मी मैदानात पोहोचले तेव्हा प्रचंड घाबरले होते. सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते; कारण इतर सर्व उमेदवार अंगात ट्रॅकसूट, पायात महागडे शूज आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन आले होते. ते वातावरण पाहून मला अवघडल्यासारखे झाले. पण मी मागे हटले नाही.”

महिला उमेदवारांना भरतीसाठी १० मिनिटांत १६०० मीटर अंतर कापणे अनिवार्य असते. मात्र, कविता यांनी हेच अंतर अवघ्या आठ मिनिटांत पूर्ण करत ‘उत्कृष्ट’ श्रेणीसह पूर्ण गुण मिळवले. “लोकांनी टाळ्यांचा गजर सुरू करेपर्यंत मी काय पराक्रम केला आहे याची मला जाणीवच नव्हती. पायातल्या चपला काढल्या आणि धावायला लागले. धावताना डोक्यात फक्त एकच विचार होता की, कोणत्याही परिस्थितीत होमगार्डची ही नोकरी मिळवायचीच,” असे कविता यांनी सांगितले.

Swati Chaturvedi BJP Leader Spat
‘जा माझे निलंबन करा, अजून काय करू शकता’, महिला अधिकाऱ्याचे भाजपा नेत्याला रोखठोक उत्तर

गरिबी, कर्ज अन् वैधव्याचे आघात

सहन करणाऱ्या कविता यांची संघर्षगाथा डोळ्यात अश्रू आणणारी आहे. २००९ मध्ये लहान वयातच त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती दीपक कुमार महतो हे मुंबई आणि गुजरातमधील कारखान्यांमध्ये रोजंदारीवर काम करत होते. करोना काळात आजारी पडल्याने ते गावी परतले. आजारपण वाढत गेले आणि २०२३ मध्ये त्यांचे निधन झाले. या दुःखातून सावरत नाही तोच सहा महिन्यांत त्यांच्या दिराचेही निधन झाले.

पतीच्या दीर्घ आजारपणाच्या उपचारासाठी कुटुंबावर तब्बल ६ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. ते फेडण्यासाठी आणि आपल्या दोन चिमुरड्यांच्या शिक्षणासाठी कविता सध्या वीटभट्टीवर मोलमजुरीचे काम करतात. यापूर्वी त्या एका खासगी कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होत्या; मात्र रात्री उशिरा ड्युटी संपल्यानंतर गावी परतण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने ती नोकरी त्यांना सोडावी लागली.

यूट्यूबच्या मदतीने सराव; मदतीचे हात पुढे

भरतीच्या मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी कविता यांच्याकडे कोणतीही साधनसामग्री नव्हती. मोबाईल नीट हाताळता येत नसल्याने त्या मुलांकडून यूट्यूब सुरू करून घेत आणि त्यावर पाहून धावण्याचे तंत्र शिकत असत. त्यांच्या गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘एचएमटी फिजिकल ॲकॅडमी’चे प्रशिक्षक आणि स्वतः होमगार्ड असलेले अजय करमाली यांनी त्यांना मोफत मार्गदर्शन केले. “आज तिच्या अंगावर धावण्याचा ट्रॅकसूट नसला, तरी लवकरच ती होमगार्डचा खाकी गणवेश परिधान करेल,” असा ठाम विश्वास करमाली यांनी व्यक्त केला.

IAS Neha Byadwal Success Story
५वीत नापास, ३ वेळा अपयश; अवघ्या २४ व्या वर्षी बनल्या IAS अधिकारी! नेहा ब्याडवाल यांची प्रेरणादायी कहाणी

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून मदतीचे हातही पुढे आले आहेत. डुमरीचे आमदार जयराम कुमार महतो यांनी दूरध्वनीवरून कविता यांच्याशी संवाद साधत त्यांना धावण्यासाठी लागणारा ट्रॅकसूट आणि शूज भेट म्हणून पाठवले आहेत.

रामगढ जिल्ह्यात २८४ पदांसाठी १६ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. या भरतीत ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव असून, ५ टक्के जागा विधवा महिलांसाठी आरक्षित आहेत. याच आरक्षणातून स्वतःचे आणि मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी कविता आता अंतिम मैदानी चाचणीसाठी सज्ज झाल्या आहेत.