KBC winner Amita Singh Tomar has been arrested by MP police: ‘ज्ञान’ आणि ‘नशिबा’च्या जोरावर ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोमध्ये ५० लाख रुपये जिंकून देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. २०२१ मधील पूरग्रस्तांच्या मदत निधीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, सध्या त्यांची रवानगी शिवपुरी येथील महिला कारागृहात करण्यात आली आहे.
नेमका काय आहे घोटाळा?
अमिता सिंह तोमर या श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. २०२१ मध्ये श्योपूर जिल्ह्यात विनाशकारी पूर आला होता. सरकारने पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. तपासाअनुसार, बडोदा तालुक्यातील ७९४ पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, ऑडीटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. हा २ ते २.५ कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत पोहोचण्याऐवजी १२७ बनावट किंवा असंबंधित बँक खात्यांमध्ये वळवण्यात आला होता.
कसा रचला गेला कट?
पोलिसांच्या मते, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करून केलेला एक व्यापक कट होता. तपासात १०० हून अधिक व्यक्तींची नावे समोर आली असून, त्यात दोन डझनांहून अधिक तलाठ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अमिता सिंह तोमर यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्येही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या आधारावर पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
न्यायालयीन कारवाई आणि अटक
अमिता सिंह तोमर यांनी अटकेपासून वाचण्यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. यानंतर श्योपूरचे जिल्हाधिकारी अर्पित वर्मा यांनी त्यांना तत्काळ पदावरून हटवले आणि २६ मार्च रोजी ग्वाल्हेरमधील निवासस्थानातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
बचाव पक्षाचा दावा
दुसरीकडे, तोमर यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. लाभार्थ्यांच्या याद्या पटवारींनी तयार केल्या होत्या आणि त्यावर केवळ स्वाक्षरी करण्याचे काम तोमर यांनी केले, असा दावा बचाव पक्षाने केला आहे. त्यांनी कोणताही थेट आर्थिक लाभ घेतला नसून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, सध्या पोलीस या प्रकरणातील आर्थिक साखळीचा अधिक तपास करत आहेत.
