पीटीआय, नवी दिल्ली
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ‘मूलभूत ठराव’ आणण्याची नोटीस दिली. गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या त्यांच्या भूमिकेवर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आम्हाला कोणत्याही ठरावांची भीती नाही. फाशी द्यायची असेल तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत,’ असे ते म्हणाले.
लोकसभेत गांधी यांच्या काही वक्तव्यांची नोंद बुधवारी कामकाजातून वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर वेणुगोपाल यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ‘लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी आम्ही टोकाची भूमिका का घेतली, असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर असे की, आम्हाला अध्यक्षांकडून न्याय मिळत नाही,’ असे ते म्हणाले.
दुबे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मूलभूत ठराव आणण्याची नोटीस दिल्याचे सांगत, माजी काँग्रेस अध्यक्षांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी केली आहे. संसद भवन संकुलात पीटीआयशी बोलताना दुबे म्हणाले की, विरोधी पक्षनेते परदेश दौऱ्यांदरम्यान सोरोस फाउंडेशन, यूएसएआयडी, फोर्ड फाउंडेशन यांच्याबरोबर हातमिळवणी करतात आणि भारतविरोधी घटकांशी संगनमत करतात, असे त्यांनी आपल्या नोटिशीत नमूद केले आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान लोकसभेत गांधी यांच्या वक्तव्यांवर सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता वेणुगोपाल म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी कोणता विशेषाधिकार भंग केला? मागील वेळी त्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर काय झाले? जनतेने त्यांना नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मतांनी विजयी केले.’ ‘आम्हाला कोणत्याही ठरावांची चिंता नाही. फाशी द्यायची असेल तरी आम्ही तयार आहोत. संसदेत आम्ही सत्य मांडत राहू,’ असे ते म्हणाले.
विरोधी पक्ष सदस्यांना बोलण्याची संधी देऊ नये, असा दबाव सरकार अध्यक्षांवर आणत आहे. राहुल गांधी जे काही बोलले ते संपूर्णपणे कामकाजातून वगळले गेले. मात्र, निर्मला सीतारामन यांनी केलेली तत्सम वक्तव्ये नोंदीत समाविष्ट करण्यात आली. सरकारची दुहेरी भूमिका आहे. ही संसद सत्ताधाऱ्यांसाठी चालते आहे, विरोधकांसाठी नाही. – के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस, काँग्रेस
