महेश सरलष्कर, लोकसत्ता

हैदराबाद : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये दाखल झाले. पण, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राजशिष्टाचाराचा भंग करत मोदींकडे पाठ फिरवली. मोदींच्या स्वागत करण्यासाठी ‘केसीआर’ विमानतळावर गेले नाहीत. मात्र, विरोधकांचे राष्ट्रपती पदाचे सर्वसंमत उमेदवार यशवंत सिन्हा यांचे मात्र त्यांनी स्वागत केले. भाजपच्या बैठकीत ‘केसीआर’ यांच्या वर्तवणुकीवर त्यांचा उल्लेख न करता तीव्र टीका झाली.

मोदींच्या आधी यशवंत सिन्हा हैदराबादमध्ये येऊन पोहोचले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या पािठब्यासाठी यशवंत सिन्हा देशभर दौरा करत आहेत. यशवंत सिन्हा यांच्या स्वागताला मुख्यमंत्री ‘केसीआर’ उपस्थित राहू शकतात तर, पंतप्रधानांचे स्वागत का करू शकत नाहीत, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ‘केसीआर’ यांनी तिसऱ्यांदा मोदींचे स्वागत करण्यास नकार दिला असल्याने भाजप संतप्त झाला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनिमित्त तेलंगणामध्ये भाजप आणि सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीतील सुमारे साडेतीनशे सदस्यांची बैठक शनिवारी सुरू झाली. बैठकीच्या सुरुवातीला झालेल्या भाषणात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘केसीआर’ यांचा उल्लेख टाळला असला तरी, विरोधकांचे राजकारण नकारात्मक व विद्ध्वंसक असल्याची टीका केली. भाजपचे राजकारण रचनात्मक असले तरी, देशातील विरोधी पक्ष मात्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना, धोरणे आणि कार्यक्रमांना विरोध करतात, त्यांचे राजकारण विकासविरोधी आहे. बहुतांश विरोधी पक्षांमध्ये घराणेशाही असून नेते भ्रष्टाचारी आहेत, अशी टीकाही नड्डा यांनी केली.

गेल्या आठ वर्षांमध्ये मोदींनी मुख्यमंत्री असो वा पक्षांचे नेते, प्रत्येकाला सन्मानाने वागवले आहे. पण, ‘केसीआर’ यांनी मोदींना दिलेली वागणूक ही संविधान, राजकारण, संस्कृती अशा अनेक मर्यादांचा भंग करणारी आहे. ‘केसीआर’ यांनी व्यक्तीचा नव्हे तर, पंतप्रधान या पदाचा (संस्थेचा) अपमान केला आहे, अशी टिप्पणी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत केली.

घराघरात तिरंगा, भाजपही!

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’तून भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करत असल्याचे मानले जात आहे. अमृत महोत्सवातंर्गत ‘घराघरात तिरंगा’ हा कार्यक्रम राबवला जाणार असून ते देशव्यापी आंदोलन असेल, अशी माहिती उपाध्यक्ष वसुंधराराजे शिंदे यांनी दिली. या मोहिमेतून वीस कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे ध्येय आहे.

लोकप्रिय योजनाच तारणहार

आठ वर्षांत मोदी सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्या तरी त्याचे महत्त्व लोकांना पाठवून द्यावे लागेल, अन्यथा या योजनांचा विस्तार होणार नाही, असा मुद्दा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडला गेला. योजनांच्या माध्यमातून तीस कोटी लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत योजना कशा पोहोचल्या, लोकांना कसा लाभ झाला, या दोन्ही बाबी लोकांसमोर मांडल्या जातील. भाजपसाठी केंद्राच्या लोकप्रिय योजनाच तारणहार असल्याने त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.