देशभरातून चारधाम यात्रेसाठी लाखो भाविक जात असतात. मात्र बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा या यात्रेवर मोठा परिणाम होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. आता उत्तराखंडमध्ये सुरू असलेली केदारनाथ यात्रा प्रशासनाने तात्पुरती थांबवली आहे. केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे, त्यामुळे येथील रस्ता बंद झाल्यामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
गौरीकुंड राष्ट्रीय महामार्गावरील रामपूर बाजारजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी रस्ता देखील खचण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या ठिकाणी दरड हटवण्याचे आणि रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या ठिकाणी सुरक्षिततेची कामे देखील हाती घेण्यात आली आहेत.
चारधाम यात्रेच्या गौरीकुंड गेटजवळ दरड कोसळल्याने केदारनाथ यात्रा मार्ग प्रशासनाकडून तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तसेच सध्या भाविकांची ये-जा देखील थांबवण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, या पावसादरम्यानच दरड कोसळल्याची घटना घडली, जेव्हा घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे एक मोठा अपघात टळला.
गौरीकुंड गेटपासून जवळपास २०० मीटर अंतरावर यात्रेकरुंच्या मार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात मलबा, मोठे दगड आणि माती कोसळली. त्यामुळे केदारनाथकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत भाविकांची ये-जा थांबवली. या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अचानक मोठ्या प्रमाणावर दरडीचा काही भाग, खडक आणि मोठ्या प्रमाणात माती डोंगरावरून खाली कोसळली. पण ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी भाविक नव्हते, जर त्यावेळी तेथे भाविक असते तर मोठी दुर्घटना घडली असती. दरड कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, डीडीआरएफ आणि संबंधित विभागांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
