UK Prime Minister Resignation News: ब्रिटनच्या राजकारणातून अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. अंतर्गत वाढत्या दबावापुढे अखेर झुकत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. लेबर पार्टी अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली जात होती. सातत्याने घसरणारी लोकप्रियता आणि पक्षातच होणारा विरोध यांमुळे अखेर सोमवारी त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. नवीन उत्तराधिकारी मिळेपर्यंत ते हंगामी पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
‘१० डाऊनिंग स्ट्रीट’वरून भावूक निरोप
पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना कीर स्टार्मर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते. जुलै २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर, अवघ्या दोन वर्षांच्या आत स्टार्मर यांना अशा प्रकारे पायउतार व्हावे लागल्याने ब्रिटनच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.
राजीनामा देताना कीर स्टार्मर नेमकं काय म्हणाले?
आपल्या कार्यकाळातील कामगिरीबद्दल बोलताना स्टार्मर म्हणाले, “सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी लेबर पार्टीची धुरा हाती घेतली, तेव्हा हा पक्ष आता संपला आहे, असे मला वारंवार सांगण्यात आले होते. पण आम्ही लोकांना चुकीचे ठरवले. आम्ही पुन्हा सत्तेत आलो.” ते पुढे म्हणाले की, “कठोर परिश्रमांमुळेच पक्षात हा बदल शक्य झाला. एका विशेषाधिकारप्राप्त वर्गाऐवजी, सर्वसामान्य नागरिकांना आदर, संपत्ती आणि समान संधी देणारा ब्रिटन घडवणे हे आमचे स्वप्न होते आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले.”
१० वर्षांत ७ पंतप्रधान
देशातील राजकीय अस्थिरता संपवण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळेल, असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले. स्टार्मर यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनमध्ये अवघ्या १० वर्षांत सातवा पंतप्रधान सत्तेवर येणार आहे.
आर्थिक सुधारणा आणि कामगिरीचा पाढा
आपल्या कार्यकाळातील यशाचा उल्लेख करताना स्टार्मर यांनी दावा केला की, त्यांच्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले, देशात मोठी गुंतवणूक आणली आणि आर्थिक टंचाईचा काळ संपवला. याशिवाय, कामगारांच्या हक्कांचे रक्षण करत जवळपास ५ लाख लोकांना गरिबी रेषेबाहेर काढल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
…आणि मी राजीनामा देत आहे!
गेल्या काही काळापासून लेबर पार्टीमध्ये स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवायची की नाही, यावरून अंतर्गत कलह शिगेला पोहोचला होता. यावर बोलताना स्टार्मर म्हणाले, “माझा पक्ष सध्या एकच प्रश्न विचारत आहे की, आगामी निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का? आणि मला माझ्या पक्षाचे उत्तर मिळाले आहे. मी या निर्णयाचा आदर करतो आणि आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे.”
स्टार्मर यांच्या या अनपेक्षित एक्झिटमुळे आता ब्रिटनचा नवा पंतप्रधान कोण होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लेबर पार्टी लवकरच आपल्या नव्या नेत्याची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार आहे.
