दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आरोप केला की “केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) अनावश्यकपणे प्रत्येकाला त्रास देत आहेत”. तसेच, “मद्य घोटाळा नक्की काय आहे हे अद्यापही समजत नाहीये. देशाची अशी प्रगती होऊ शकत नाही.” असेही केजरीवाल म्हणाले आहेत.

राष्ट्रीय राजधानीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, “उपराज्यपाल, सीबीआय आणि भाजपाने कथित घोटाळ्यात गुंतलेल्या वेगवेगळ्या रकमेचा उल्लेख केला आहे, परंतु ते प्रत्यक्षात काय होते हे त्यांना समजले नाही. “त्यांच्या (भाजप) एका नेत्याने ८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे म्हटले आहे, उपराज्यपालांचे म्हणणे आहे की हा १४४ कोटींचा घोटाळा आहे आणि सीबीआय एफआयआर सांगतो की १ कोटी रुपयांचा घोटाळा आहे. ‘मद्य घोटाळा’ नक्की काय आहे तेच समजत नाहीये.”

केजरीवाल म्हणाले की, “भाजपा सीबीआय आणि ईडीचा वापर करून देशभरात सर्वांना धमकावत आहे. “सीबीआयच्या छाप्यांवर बोलण्याऐवजी आणि विचार करण्याऐवजी त्यांनी आमच्यासारखं महत्त्वाच्या सार्वजनिक कामांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.”

“तुम्ही सत्तेच्या नशेत…” दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून अण्णा हजारेंची केजरीवालांवर बोचरी टीका

आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ मध्ये कथित अनियमिततेच्या तपासाचा भाग म्हणून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशभरातील सुमारे ४० ठिकाणी नव्याने छापेमारी केली आहे. यानंतर काही तासांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे हे विधान समोर आले आहे.

आम आदमी पार्टी विरोधातील “स्टिंग ऑपरेशन” वर भाजपाला प्रत्युत्तर देताना केजरीवाल म्हणाले, “यामध्ये मद्य घोटाळ्यातील एक आरोपी असे म्हणताना ऐकू येते की, उत्पादन शुल्क धोरण अशा प्रकारे तयार केले गेले आहे की काही निवडक लोकांना फायदा झाला. तर, “हे स्त्रोत कोण आहेत? दिल्ली मद्य धोरणात काय घोटाळा आहे हे मला आत्तापर्यंत समजू शकले नाही. भाजपा दररोज वेगवेगळे आकडे आणि घोटाळ्यांची रक्कम घेते, तर सीबीआय एफआयआर फक्त १ कोटी रुपये सांगतो. त्यांनी (मनीष) सिसोदिया यांच्या घरावर आणि बँकेच्या लॉकरवर छापा टाकला आणि त्यांना काहीही मिळाले नाही. त्यांनी त्यांच्या (सिसोदियाच्या) लोकांकडेही विचारपूस केली पण काहीही सापडले नाही.” असंही केजरीवाल म्हणाले.