दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना मोठा राजकीय धक्का देत आप म्हणजे आम आदमी पार्टीच्या सात खासदारांनी भाजपात प्रवेश केला. या सगळ्यांना भाजपा खासदार म्हणून राज्यसभेने मान्यताही दिली. राघव चड्ढा आणि स्वाती मालीवाल ही या सात खासदारांपैकीची महत्त्वाची दोन नावं. आपण जाणून घेऊन कोण आहेत स्वाती मालीवाल?

कोण आहेत स्वाती मालीवाल?

स्वाती मालीवाल या आपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक चेहरा होत्या पण आता त्या भाजपाच्या खासदार आहेत. स्वाती मालीवाल यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी अगदी आम आदमी पार्टी पक्षाच्या स्थापनेपूर्वीपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. स्वाती या त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानल्या जात. कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्या केजरीवाल यांच्या ‘परिवर्तन’ स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करू लागल्या. त्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील रहिवासी आहेत. २०११ मधील अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या २३ सदस्यीय कोअर कमिटीचाही त्या भाग होत्या.

Swati Maliwal News
स्वाती मालिवाल नेमक्या कोण आहेत? (फोटो-फेसबुक पेज, स्वाती मालीवाल)

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून केलं आहे काम

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांची महिला आयोगाच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषवलेल्या त्या सर्वात तरुण महिला ठरल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात दिल्लीतील मुली आणि महिलांवरील गुन्ह्यांची १.७ लाखांहून अधिक प्रकरणे हाताळली. मालीवाल यांनी वडिलांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती उघड केल्यानंतर त्या चर्चेचा विषय ठरल्या. यापूर्वी मालीवालदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. २०१६ मध्ये, लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने दिल्ली महिला आयोगामध्ये झालेल्या नियुक्तींमध्ये अनियमिततेच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. २०२४ च्या मे महिन्याच्या सुरुवातीला, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्ली महिला आयोगातील ५२ बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. त्यांची नियुक्ती मालीवाल यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती.

जनसेवेसाठी सोडली लाखोंच्या पगाराची नोकरी

स्वाती या २२ वर्षांच्या असताना स्वाती मालीवाल यांच्याकडे लाखोंचे पॅकेज असलेला आयटीचा जॉब होता. एचसीएस कंपनीच चांगल्या पदावर त्या कार्यरत होत्या. पण त्यांनी ती नोकरी सोडली. झोपडपट्टीमध्ये गरीबीत राहणाऱ्या मुलांसाठी काम करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी संघटनेसोबत मिळून गरीब आणि गावातील तरुणांसाठी काम करायला सुरुवात केली होती.

Swati Maliwal News
स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत्या आता त्या भाजपात गेल्या आहेत. (फोटो-ANI)

२०२० मध्ये स्वाती मालीवाल यांचा घटस्फोट

स्वाती मालीवाल यांनी १९ फेब्रुवारी २०२० ला पती जय हिंद यांना घटस्फोट दिला. यासंदर्भात माध्यमांमध्ये चर्चा झाली होती. आपण लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण तसे झाले नाही. पण जे काही झालं त्याचा पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. आता भाजपात गेल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर स्वाती मालीवाल यांनी गंभीर आरोप केले होते.

२०२४ मध्ये स्वाती मालीवाल का चर्चेत आल्या होत्या?

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार पदी असलेल्या स्वाती मालीवाल या २०२४ मध्ये पुन्हा चर्चेत आल्या होत्या.कारण त्यांनी त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सविचावावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांमुळे आम आदमी पक्षच अडचणीत आला होता. त्यावेळी स्वाती मालीवाल यांना मारहाणही झाली होती. १३ मे २०२४ रोजी स्वाती मालीवाल यांनी सकाळी पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी कुमार (अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव) यांनी आपल्याला मारहाण केली आहे. दिल्ली पोलिसांनी या फोन कॉलची नोंद डायरीत करुन घेतली होती. अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरुन हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मालीवाल यांनी केला होता. १४ मे रोजी आप पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्वाती मालीवाल यांनी केलेले आरोप मान्य केले होते. बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना मारहाण केली हे पक्षाने मान्य केलं होतं. ज्यानंतर आम आदमी पक्षावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

स्वाती मालीवाल भाजपात गेल्याने आपला धक्का

राघव चड्ढा हे जितके अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. तितक्याच जवळच्या सहकारी म्हणून स्वाती मालीवाल ओळखल्या जात होत्या. २०२४ च्या मारहाणीनंतरही त्यांनी केजरीवाल यांच्या साथ सोडली नव्हती. पण राघव चड्ढांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासह स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम साहनी अशा सात जणांनी भाजपात प्रवेश केला. या सातही खासदारांना भाजपाचे खासदार म्हणून राज्यसभेने मान्यताही दिली. त्यामुळे राघव चड्ढांसह स्वाती मालीवाल यांनीही भाजपात जाणं हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.