आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फॉर्च्यून या माध्यम मासिकाने जगातील ५० महान नेत्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. आम आदमी सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दल फॉर्च्यूनने केजरीवाल यांचे विशेष कौतुक केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध ‘फॉर्च्यून’ मॅगिझनच्या या यादीत स्थान मिळवणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यादीमध्ये पाचवे स्थान मिळविले होते, मात्र यावर्षी त्यांना ५० जणांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. फॉर्च्युन मासिकाच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज हे अव्वल स्थानावर असून केजरीवाल ४२ व्या स्थानावर आहेत. तर जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुस-या स्थानावर आहेत. अमेरिकेतील देशांतर्गत व जागतिक आव्हानांसमोर बराक ओबामा यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना सलग तिसऱ्या वर्षी या यादीतून वगळण्यात आले आहे.
दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात १५ दिवसांसाठी सम-विषम वाहतूक योजनेचा प्रयोग राबवला होता, जो यशस्वी ठरला. येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा १५ दिवसांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.